हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन दिले निवेदन !
कुडाळ – मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतातील एकमेव ‘शिवराजेश्वर मंदिर’ आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मंदिरासाठी सरकारकडून प्रतीमासाला केवळ २५० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील शिवसेना आमदार श्री. वैभव नाईक यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले की, छत्रपती शिवराय नसते, तर महाराष्ट्राची भूमी आक्रमणकर्त्यांच्या कह्यात असती. शिवरायांनी महाराष्ट्राच्या भूमीचे आणि येथील संस्कृतीचे प्राणपणाने रक्षण केले. त्यासाठी उभे आयुष्य वेचले. अशा राष्ट्रपुरुषाच्या मंदिरासाठी प्रतीमास केवळ २५० रुपये देणे, ही गोष्ट शासनासाठी शोभनीय नाही. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या अल्प भत्त्यामध्ये मंदिरात दिवा बत्ती करणे, वीजदेयक भरणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी प्राथमिक आणि अत्यावश्यक गरजांची पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या छत्रपती शिवरायांच्या या मंदिरासाठीच्या भत्त्यात वाढ करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी वर्ष १६९५ मध्ये हे मंदिर बांधले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतातील हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या ‘पायांचे ठसे’ आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत. या मंदिरासाठी शासनाकडून प्रतीवर्षी २ सहस्र १०० रुपये इतका भत्ता दिला जातो. मंदिराला भत्ता देण्याचा निर्णय ३० मार्च १९७० या दिवशी शासनाने घेतला. याविषयीचा महसूल आणि वन विभाग यांचा १ एप्रिल १९७० चा शासन आदेश उपलब्ध आहे. वर्ष १९७०-७१ पासून मंदिराला दिला जाणारा वार्षिक भत्ता वाढवून ३ सहस्र रुपये इतका करण्यात आला; मात्र यानंतर या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली नाही.
Monthly Only ₹250 from Archaeological dept for d only temple of #Chhatrapati Shivaji Maharaj in Maharashtra at Sindhudurg Fort
If they don't have time for forts & temples,then why feed a white elephant of State Archaeology Dept @HinduJagrutiOrg Demands for raising funds@ASIGoI pic.twitter.com/wqTAdC11KG— Sunil Ghanwat (@SG_HJS) June 9, 2022
शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या अजोड कार्याची माहिती देण्यात यावी !
शिवरायांचे कार्य अजोड आहे. शिवरायांच्या या कार्याचा इतिहास केवळ युवकांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी, अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी. त्यामुळे नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. त्यामुळे सरकारने लक्ष देऊन, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
मंदिराची पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणे !
पर्यटन विभाग, शासनाचे प्रतिनिधी, तसेच इतिहासतज्ञ यांनी एकत्रितपणे मंदिराची पहाणी करून मंदिराचे जतन आणि शिवरायांच्या कार्याची माहिती देण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण आराखडा निश्चित करावा. यासाठी आवश्यक तो निधी सरकारकडून देण्यात यावा आणि कालमर्यादा निश्चित करून हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.