समुपदेशनासह ‘साधना’ शिकवा !

वैवाहिक कलह होऊन निर्माण झालेले मतभेद आणि गैरसमज दूर करून संसार सुरळीत करण्यात कौटुंबिक न्यायालयांमध्ये चालू केलेला ‘चला बोलूया’ हा उपक्रम लाभदायी ठरत आहे. मागील ४ वर्षांत या उपक्रमांतर्गत १ सहस्र १०१ प्रकरणे नोंद झाली. समुपदेशनानंतर ११७ जोडपी पुन्हा एकत्र नांदण्यासाठी सिद्ध झाली, तर १०४ जोडप्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाची तडजोड केली. पती-पत्नींमधील किरकोळ कारणांमुळे निर्माण झालेले वैवाहिक आणि कौटुंबिक स्वरूपाचे वाद प्रत्यक्षात न्यायालयात नोंद होण्यापूर्वी संपुष्टात यावेत, या उद्देशाने न्यायालयाने प्रयत्न चालू केले आहेत. त्याअंतर्गत ऑगस्ट २०१८ मध्ये ‘चला बोलूया, परस्पर संमतीने वाद मिटवूया’, या समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. सध्याच्या वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण पहाता या केंद्राच्या माध्यमातून पती-पत्नींमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या न्यायालयाच्या या उपक्रमाचे कौतुक आहे.

बऱ्याचदा पती-पत्नींमधील वाद हे किरकोळ कारणावरून प्रारंभ होऊन नंतर त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. अनेक वेळा या भांडणाचा शेवट घटस्फोटात होतो. सध्याच्या युवा पिढीमध्ये संयम न्यून झाल्यामुळे शीघ्रकोपी टोकाची भूमिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी विवाहानंतरच एकमेकांचा स्वभाव कळत होता. आता पती-पत्नी विवाहाच्या अगोदरपासूनच एकमेकांना ओळखतात, एकमेकांची आवड-नावड ठाऊक असतात. तरीही काहींवर घटस्फोट घेण्याची वेळ का येते ? याचा बौद्धिकदृष्ट्या विचार केल्यास तसे ठोस कारण समजत नाही. धर्मशास्त्रानुसार पती-पत्नी यांच्यात अन्य नात्यांच्या तुलनेत सर्वांत अधिक देवाण-घेवाण हिशोब असतो. त्यामुळे वरकरणी वादाचे कारण क्षुल्लक असले, तरी त्यामागे ‘देवाण-घेवाण हिशोब’ कार्यरत असतो.

त्यामुळे पती-पत्नी यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब न्यून होण्यासाठी मानसिक समुपदेशनासह त्यांनी ‘साधना’ करणेही आवश्यक आहे. धर्मशास्त्रानुसार तळमळीने साधना केल्यास देवाण-घेवाण न्यून होण्यास साहाय्य होते. साधनेमुळे ईश्वरी कृपा होते. त्याचा जीवनामध्ये अनेक अंगांनी लाभ होतो. साधना म्हणजे नामजपाद्वारे भगवंताची भक्ती करणे. साधनेमुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो. त्यामुळे व्यक्तीला कुठलाही प्रसंग हाताळण्यासाठी बळ मिळते, विचारांमध्ये प्रगल्भता येते. हिंदु राष्ट्रात सर्वांना साधना शिकवली जाईल.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर