उत्तरप्रदेश, बिहार यांसारखी ‘हिंदी’ भाषिक राज्ये मागासलेली !

द्रमुकच्या खासदाराचे हिंदीद्वेषी विधान

द्रमुकचे राज्यसभेतील खासदार टीकेएस् एलनगोवन्

चेन्नई (तमिळनाडू) – द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ) पक्षाचे राज्यसभेतील खासदार टीकेएस् एलनगोवन् यांनी हिंदी भाषेचा वापर करणारे लोक ‘शूद्र’ बनतात. हिंदी भाषा वापरणारी राज्ये ‘मागासलेली’ आहेत, असे हिंदीद्वेषी विधान केले.

ते पुढे म्हणाले की, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान यांसारखी राज्ये हिंदी भाषेचा वापर करतात. दुसरीकडे बंगाल, ओडिशा, तेलंगाणा, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब यांसारख्या विकसित राज्यांमध्ये हिंदीचा वापर होतो का ? या राज्यांची मातृभाषा हिंदी नाही.

गेल्या काही कालावधीपासून दक्षिण भारतातील राजकीय नेते हिंदीद्वेषी विधाने करत आहेत.

तमिळनाडूचे शिक्षण मंत्री यांनी इंग्रजीला हिंदीच्या तुलनेत ‘बहुमूल्य’ म्हटले होते. त्यांनी ‘इंग्रजी एक अंतरराष्ट्रीय भाषा आहे, तर हिंदी बोलणारे पाणी-पुरी विकतात’, असे विधान केले होते. तमिळनाडूचेच आरोग्य मंत्री सुब्रह्मण्यम् यांनी तमिळनाडूमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढण्याला उत्तर भारतातील हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना उत्तरदायी ठरवले होते.

संपादकीय भूमिका

अशी विधाने करून देशातील नागरिकांमध्ये फूट पाडू पहाणारे असे लोकप्रतिनिधी कधी जनतेला एकसंध राखतील का ? अशांवर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !