नैरोबी (केनिया) – आफ्रिकेत दुष्काळामुळे आधीच खाद्य संकट निर्माण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आफ्रिकेतील हे संकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. लाखो आफ्रिकन लोक भुकेल्या पोटीच झोपी जात आहेत. अशा स्थितीत आफ्रिकेला रशियाकडून मोठ्या आशा आहेत, असे वक्तव्य आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष तथा सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी सॉल यांनी केले. सॉल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची रशियातील सॉची या शहरात भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. आफ्रिकेतील अनेक देश गहू, मका, खाद्यतेल यांसारख्या मुख्य अन्नपदार्थांसाठी युक्रेन आणि रशिया यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.
African Union Chair Meets Putin to Discuss Food Insecurity https://t.co/OoKXog5HeF
— VOA Africa (@VOAAfrica) June 3, 2022
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाला आता १०० हून अधिक दिवस झाले आहेत. जागतिक स्तरावर उभय देश खाद्यसामग्रीची मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. युद्धामुळे त्यावर पुष्कळ मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेला खाद्य सामग्रीची आवश्यकता भेडसावू लागली आहे. जगातील पालटती राजकीय समीकरणे पहाता रशियालाही मित्र राष्ट्रांची आवश्यकता आहे. या दृष्टीकोनातून रशियालाही नवे आफ्रिकन मित्र देश मिळण्याची आशा आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.