वजूखान्यात शिवलिंग, तर भिंतींवर त्रिशूळ आणि हत्ती यांचे चिन्ह

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातील चित्रीकरणाचा व्हिडिओ आणि छायाचित्रे उघड

हिंदु पक्षाकडून व्हिडिओ उघड करण्यात आल्याचा मुसलमान पक्षाचा आरोप

टीप : वजूखाना म्हणजे नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर येथील ज्ञानवापी मशिदीचे न्यायालय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदु पक्षांना देण्यात आल्यानंतर काही घंट्यांतच त्यातील काही व्हिडिओ आणि छायाचित्रे उघड झाली आहेत. न्यायालयाने हे चित्रीकरण आणि छायाचित्रे उघड न करण्याचा आदेश दिला असतांना ती उघड झाले आहेत. उघड झालेल्या व्हिडिओमध्ये ज्ञानवापीतील वजूखान्यामध्ये मोठे शिवलिंग दिसत आहे, तसेच मशिदीच्या भिंतींवर त्रिशूल आणि हत्ती यांचे चिन्ह दिसत आहेत. हा व्हिडिओ उघड झाल्यानंतर मुसलमान पक्षांनी हिंदूंवर तो उघड केल्याचा आरोप केला, तसेच त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर हिंदु पक्षाकडून वादी असलेल्या ४ महिलांनी न्यायालयात सीलबंद व्हिडिओ परत करण्याचा प्रयत्न केल्यावर न्यायालयाने ते परत घेण्यास नकार दिला. आता यावर ४ जुलैला सुनावणी होणार आहे. हिंदु पक्षकारांचा आरोप आहे की, व्हिडिओ उघड करण्यामागे मोठे षड्यंत्र आहे. याची सीबीआय चौकशी केली पाहिजे. हिंदूंना अपकीर्त करण्याचा आणि यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

१. ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे उघड झाल्यानंतर हिंदु पक्षाच्या अधिवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे व्हिडिओ असलेले लिफाफे अजूनही सीलबंद आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी आम्ही न्यायालयाकडे मागणी करणार आहोत.

२. मुसलमान पक्षाचे अधिवक्ता अभयनाथ यादव म्हणाले की, व्हिडिओ उघड करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ यांची सीडी हिंदु पक्षाने न्यायालयातून घेतली आहे. आम्ही ही सीडी घेतलेली नाही. आम्ही या व्हिडिओ आणि छायाचित्रे यांचा अपवापर होण्याची शक्यता आधीच वर्तवली होती. आमच्याकडून न्यायालयात सादर करण्यात येत असलेल्या युक्तीवादापुढे हिंदु पक्षाकडे काहीही उत्तर नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना गोंधळात टाकण्यासाठी हा व्हिडिओ उघड केला गेला आहे. यामागे मोठे षड्यंत्र आहे, हे नाकारता येणार नाही. सर्वेक्षणाचा व्हिडिओ उघड करणे, हे न्यायालयाच्या आदेशाचे घोर उल्लंघन आहे.

ज्ञानवापी मशिदीतील भिंतींवर त्रिशूळचे चिन्ह, तर हत्तीचे चित्र !

ज्ञानवापी परिसरात एक नंदी दिसत असून त्यासमोर ८३ फुटांवर वजूखाना आहे. याच ठिकाणी शिवलिंग सापडले आहे. मशिदीतील आतील भिंतींवर त्रिशूळचे चिन्ह दिसत आहे. भिंतीवर अनेक ठिकाणी हे चिन्ह आहेत. त्यावर पांढर रंग लावून ते लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा हिंदु पक्षकारांनी केला आहे. याखेरीज  भिंतींवर काही कलाकृती साकारण्यात आलेल्या आहेत. यामध्ये हत्तीचे चित्र दिसत आहे.