पुणे येथील ‘ससून’मधील ८०० परिचारिका संपामध्ये सहभागी !

राज्यातील परिचारिकांचा बेमुदत संप

पुणे – वैद्यकीय शिक्षण विभागांशी संलग्न रुग्णालयातील परिचारिका विविध मागण्यांकरिता २८ मे या दिवसापासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यात ससून सर्वोपचार रुग्णालयातील तातडीची सेवा वगळता इतर ८०० परिचारिकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे औंध रुग्णालयातील १९ परिचारिका आणि विद्यार्थ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या एकूण परिचारिकांपैकी ९० टक्के परिचारिका संपावर गेल्या आहेत, असा दावा संघटनेने केला आहे.

परिचारिका संवर्गातील सर्व स्तरांवरील १०० टक्के पदोन्नती, पदनिर्मिती आणि पदभरती बाह्यस्रोताद्वारे न भरता कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी, केंद्र सरकारप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, वेतनवाढ करावी यांसह इतर मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यस्तरीय २ दिवस कामबंद आंदोलन पुकारले होते; परंतु राज्य सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे २८ मेपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

संपादकीय भूमिका

संप म्हणजे राष्ट्राची हानी ! सरकारने संबंधितांच्या अडचणी समजून घेऊन वेळीच उपाययोजना काढली असती, तर ही वेळ आली नसती.