परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाचा संकल्प फोंडा, गोवा येथे केला होता. प.पू. दास महाराज यांनी केलेले ५५ यज्ञ ३१.३.२०१९ या दिवशी पूर्ण झाले. यातील १२ व्या यज्ञाच्या वेळी साधिका सौ. मंगला मराठे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. बाराव्या ‘पंचमुखी हनुमत्कवच’ यज्ञाला परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित रहाणार नसल्याचे कळल्यावर त्यांच्या पादुकांचे पूजन करण्याचे ठरवणे
२१.४.२००२ या दिवशी सनातनच्या साधकांच्या रक्षणासाठी धामसे (गोवा) येथे प.पू. दास महाराज यांच्याद्वारे संकल्पित ५५ ‘पंचमुखी हनुमत्कवच’ यज्ञांपैकी १२ व्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले ११ यज्ञ ‘सुखसागर’ (फोंडा, गोवा) येथे झाले. त्या सर्व यज्ञांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘१२ व्या यज्ञाला काही कारणास्तव गुरुदेव उपस्थित राहू शकणार नव्हते’, असे मला कळले. तेव्हा मला वाईट वाटले. त्या वेळी ‘गुरुदेव येणार नसतील, तर त्यांच्या प्रतिकात्मक पादुका ठेवून पूजन करू शकतो’, असा विचार देवाने मला दिला. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
२. गोव्यात पादुका बनवून मिळत नसल्यामुळे त्याविषयी सावंतवाडी येथे चौकशी करणे आणि एका कारागिराने ‘पादुका बनवू शकतो’, असे सांगणे
मला लाकडी पादुका हव्या होत्या आणि ‘त्या कुठे मिळतात ?’, हे मला ठाऊक नव्हते. मी गोव्यात परिचितांकडे विचारणा केली. कुठेही पादुका मिळत नव्हत्या, तसेच पादुका बनवून देणारेही मिळत नव्हते. त्यामुळे मी निराश झाले. त्या रात्री देवाने मला सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करणारे श्री. नागेश गाडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचे नाव सुचवले. त्यानुसार मी त्यांना ‘मला २ दिवसांत कुणी पादुका बनवून देऊ शकेल का ?’, असे विचारले.
श्री. नागेश गाडे यांनी पादुकांविषयी पुष्कळ तळमळीने चौकशी केली. त्यांच्या परिचयातील पादुका बनवणारा एक कारागीर त्यांना मिळाला; परंतु तो नेमका काही कामानिमित्त मुंबईला गेल्याचे कळले. मी पुन्हा निराश झाले. त्या रात्री श्री. नागेश गाडे यांनी मला दूरभाषवरून सांगितले, ‘‘तो कारागीर काही कागदपत्रे नेण्यास विसरला होता. त्यामुळे त्याला सावंतवाडीला परत यावे लागले आणि तो २ दिवस रहाणार आहे. त्याने ‘पादुका बनवून देऊ शकतो’, असे सांगितले आहे.’’
३. गुरुदेवांच्या पादुकांचा आकार ठाऊक नसल्याने अंदाजे ११ क्रमांकाच्या चपलांच्या आकाराच्या पादुका बनवण्यास सांगणे
सावंतवाडी येथील कारागिराकडून पादुका बनवून घेण्याचे निश्चित झाले. मला गुरुदेवांच्या पादुकांचा आकार ठाऊक नसल्याने मी त्यांना अंदाजे ११ क्रमांकाच्या चपलांच्या आकाराच्या पादुका बनवण्यास सांगितले. त्यानंतर कारागिराने त्याच्या पद्धतीने पादुका बनवल्या.
४. पहाटे मुलासह यज्ञकुंडाजवळ पादुकांचे पूजन करणे, त्यानंतर याविषयी प.पू. दास महाराज यांना सांगितल्यावर त्यांना आनंद होणे आणि त्यांनी पादुकांचे यज्ञस्थळी पूजन करणे
‘यज्ञाला गुरुदेवांनी उपस्थित रहावे’, असे मला तीव्रतेने वाटत असल्याने मी पादुका सिद्ध करून घेतल्या होत्या. हे श्री. गाडे यांच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नव्हते. मी माझा मुलगा चि. केदार याला पहाटे उठवले आणि आम्ही दोघांनी पहाटे ३.३० वाजता यज्ञकुंडाजवळ पादुकांचे पूजन केले. (चि. केदार यज्ञाच्या वेळी बटू म्हणून बसला होता.) त्यानंतर मी पादुका कापडात बांधून यज्ञस्थळी गुरुदेवांच्या छायाचित्राच्या मागे ठेवून दिल्या. नंतर मला रहावेना; म्हणून मी प.पू. दास महाराज यांना याविषयी सांगितले. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर त्यांनी पादुका यज्ञस्थळी ठेवून त्यांचे पूजन केले आणि त्यानंतर यज्ञाला आरंभ झाला.
५. ध्यानमंदिरात पादुकांची स्थापना करून त्यांची नित्यपूजा करणे
यज्ञानंतर आम्ही गुरुदेवांच्या पादुका धामसे येथे ध्यानमंदिरात स्थापन केल्या आणि त्यांची नित्य पूजा चालू केली. आजही या पादुका आमच्या देवघरात आहेत आणि त्यांची नित्यपूजा केली जाते.
६. गुरुदेवांना कधीही न भेटलेल्या कारागिराने अंदाजाने बनवलेल्या पादुका गुरुदेवांच्या चरणांवर अगदी योग्य प्रकारे बसणे
कलेच्या संदर्भात सेवा करणार्या साधकांना ‘धामसे येथे पादुका आहेत’, हे ठाऊक होते. तेव्हा दत्ताच्या चित्रासाठी गुरुदेवांच्या चरणांचे छायाचित्र घेण्याचे ठरले. त्या वेळी एका साधिकेने मला संपर्क करून त्या पादुका सुखसागर (फोंडा, गोवा) येथे आणण्यास सांगितल्या. गुरुदेवांनी त्या पादुका धारण केल्या. तेव्हा गुरुदेवांना कधीही न भेटलेल्या कारागिराने अंदाजाने बनवलेल्या पादुका त्यांच्या चरणांत अगदी बरोबर बसल्या. यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘अरे ! या तर माझ्यासाठीच बनवलेल्या दिसतात.’’
७. धर्मसत्संगासाठी पादुकांचे चित्रीकरण करण्यात येणे
सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शित धर्मसत्संगांमध्ये एका विषयात ‘गुरु आणि पादुका’ यांविषयीची सूत्रे अंतर्भूत होती. त्या वेळी या धर्मसत्संगासाठी या पादुका देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मागवून त्यांचे चित्रीकरण करण्यात आले.
८. धामसे येथील साधकांना ‘पादुकांवर गुरुदेव विराजमान आहेत’, असे जाणवणे
धामसे येथे साधक वास्तव्यास होते. माझी मुले (कु. अपर्णा (आताची सौ. अपर्णा ऋषिकेश नाईक) आणि कु. केदार) बालपणापासून त्यांच्या समवेत असायची; कारण आम्ही (मी आणि माझे यजमान आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे) अध्यात्मप्रसारानिमित्त विविध ठिकाणी प्रवास करत होतो. माझ्या दोन्ही मुलांना ‘पादुकांना नमस्कार केल्यावर त्या पादुकांवर गुरुदेव विराजमान आहेत’, असे जाणवायचे. पादुका पहायला येणारे सर्व साधक यांनाही नेहमी ही अनुभूती येत असे.
९. ‘महर्षींच्या आज्ञेनुसार १२ वर्षांनी सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे स्थापन करण्यात आलेल्या पादुका अन् धामसे येथे बनवलेल्या पादुका’, यांच्यात साम्य असणे
पुष्कळ वर्षांपासून गुरुदेव शारीरिक अस्वास्थ्यामुळे प्रवास करू शकत नाहीत. अनुमाने १२ वर्षांनी ‘साधकांचा भक्तीभाव वाढून त्यांना श्री गुरूंचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे गुरुपादुकांची स्थापना करण्यात आली. या पादुकांची ठेवण आणि आकार हुबेहूब धामसे येथील पादुकांप्रमाणे आहे. या पादुका बनवतांना धामसे येथील पादुका संदर्भासाठी मागवल्या नव्हत्या, तरीही त्यांच्यामध्ये साम्य आहे.’
– सौ. मंगला पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१२.२०२१)
गुरुदेवांच्या पादुकांसाठी धामसे येथील फणसाच्या झाडाच्या लाकडाची फळी वापरण्यात येणे आणि ‘त्या माध्यमातून ते लाकूड गुरुचरणी समर्पित झाले’, असे जाणवणे१. वर्ष २०१९ मध्ये महर्षींच्या आज्ञेनुसार गुरुदेवांच्या पादुका बनवणार्या साधकाने सांगितलेल्या अनुभूतीवर्ष २०१९ मध्ये महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे स्थापन करण्यासाठीच्या पादुका सुतारकामाची सेवा करणारे साधक श्री. प्रकाश सुतार (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि त्यांचे सहकारी यांनी बनवल्या. याविषयी मला काहीही ठाऊक नव्हते. ही सेवा पूर्ण झाल्यावर श्री गुरूंच्या पादुकांची स्थापना झाल्यानंतर एक दिवस श्री. प्रकाश सुतार यांनी मला पुढील सूत्रे सांगितली. १ अ. पुष्कळ प्रयत्न करूनही पादुकांसाठी चंदन, आंबा किंवा फणस यांचे लाकूड न मिळणे : पादुका सिद्ध करण्यासाठी चंदन, आंबा किंवा फणस या झाडांचे लाकूड उपयुक्त असते. चंदनाचे लाकूड मिळणे शक्य नव्हते; म्हणून आंब्याच्या लाकडाचा शोध चालू झाला. काही ठिकाणी असे लाकूड उपलब्ध झाले; पण ते ओले होते. पादुकांसाठी सुकलेल्या लाकडाची आवश्यकता होती. ते पुष्कळ शोधूनही मिळत नसल्याने फणसाच्या झाडाच्या लाकडाचा पर्याय शोधण्यास आरंभ झाला. ते लाकूडही आवश्यक त्या गुणवत्तेचे मिळत नव्हते. १ आ. साधकाने ७ – ८ वर्षांपूर्वी जपून ठेवलेली फणसाच्या लाकडाची फळी शोधून काढणे : रामनाथी (गोवा) येथील आश्रमाचे बांधकाम चालू असतांना धामसे (गोवा) येथील फणसाच्या झाडांचे लाकूड वापरून झाल्यावर एक मोठी फळी शिल्लक राहिली होती. ती फळी श्री. प्रकाश सुतार यांनी जपून ठेवली होती. त्यांना त्या जुन्या फळीची आठवण झाली आणि त्यांनी ती फळी शोधण्यास आरंभ केला. पुष्कळ प्रयत्न केल्यावर त्यांना अकस्मात् एका कोपर्यात ती फळी मिळाली. १ इ. ही फळी पादुकांसाठी योग्य असल्याने गुरुदेवांनी सांगणे आणि त्या फळीतून १६ पादुका बनवणे : पुष्कळ वर्षे लोटूनही धामसे येथील फणसाच्या झाडाची लाकडी फळी पादुका सिद्ध करण्यास योग्य असल्याचे गुरुदेवांनी सांगितले. या फळीपासून पादुका सिद्ध करण्याचे निश्चित झाले. या लाकडी फळीतून १६ पादुका बनवल्या आणि त्यांचे विधीवत् पूजन करून विविध ठिकाणी त्यांची स्थापना करण्यात आली. २. २९ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धामसे येथील वास्तूच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे२ अ. गुरुदेवांनी धामसे ही पूण्यभूमी असल्याचे सांगणे आणि त्याप्रमाणे घडणे : पादुका बनवणारे साधक श्री. प्रकाश सुतार यांची अनुभूती ऐकल्यावर माझी भावजागृती झाली. मला गुरुदेवांनी धामसे येथील वास्तूच्या संदर्भात पूर्वी सांगितलेली पुढील सूत्रे आठवली. वर्ष १९९२ मध्ये गुरुदेव प्रथमच धामसे येथे आमच्या घरी आले होते. तेव्हा गाडीतून उतरून भूमीला चरणस्पर्श केल्यावर ते म्हणाले, ‘‘ही पुण्यभूमी आहे. येथे साधकांना ‘आश्रमजीवन कसे जगायचे ?’, हे शिकवता येईल.’’ पुढे प्रत्यक्षात वर्ष १९९९ मध्ये तेथे साधक सेवेसाठी येऊन राहिले. २ आ. गुरुदेवांनी धामसे येथील फळझाडे म्हणजे शापित ऋषिमुनी आणि उन्नत जीव असल्याचे सांगून त्यांना स्पर्श करणे अन् त्या जिवांना गुरुदेवांनी मुक्ती दिल्याचे साधकांना जाणवणे : वर्ष २००१ मध्ये धामसे येथील परिसरात फिरतांना गुरुदेव म्हणाले, ‘‘येथील झाडे (आंबा, पेरू, फणस) हे शापित ऋषिमुनी आणि उन्नत जीव आहेत.’’ त्यांनी सर्वत्र भ्रमण करून सर्व झाडांना स्पर्श केला आणि पानांना कुरवाळले. त्या वेळी उपस्थित सूक्ष्मातील कळणार्या साधकांनी परीक्षण केले असता त्या सर्व शापित जिवांना गुरुदेवांनी मुक्ती दिल्याचे साधकांना जाणवले. त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘या सर्व झाडांची फळे साधकांनीच ग्रहण करावी. ती विकू नयेत.’’ ३. ‘धामसे येथील फणसाच्या झाडाचे लाकूड श्री गुरूंच्या चरणी समर्पित झाले आणि गुरूंच्या पादुका बनून त्याने अढळपद प्राप्त केले’, असे जाणवणेगुरुदेवांच्या सांगण्यानुसार आम्ही त्या बागेतील फळे यज्ञासाठी आणि आश्रमातील साधकांसाठी वापरली. फणसाच्या झाडांची लाकडे आश्रमाच्या बांधकामासाठी वापरायला मिळाली. यावरून माझ्या लक्षात आले, ‘आश्रम परिसरातील प्रत्येक झाड हे गुरुसेवकच आहे आणि त्याचे प्रत्येक पान, फळ अन् लाकूड गुरुकार्यात समर्पित झाले आहे.’ धामसे येथील फणसाच्या झाडाचे लाकूड आश्रमाच्या बांधकामात समर्पित झालेच; पण साक्षात् विष्णुस्वरूप कृपाळू श्री गुरूंच्या चरणी त्यांच्या पादुका बनून त्याने अढळपद प्राप्त केले. ‘हे गुरुराया, तुमची कृपा आम्ही ‘याची देही, याची डोळां’ अनुभवत आहोत. ही आमची अनेक जन्मांची पुण्याई आहे. ‘आपणच या जिवांप्रमाणे आम्हालाही आपल्या सुकोमल चरणी समर्पित करवून घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’ – सौ. मंगला पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१२.२०२१) |
|