आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

गौहत्ती – राज्यात ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या धर्मांतराच्या कारवाया वाढल्या असून ते  चहाच्या बागांमध्ये काम करणारे आर्थिकदृष्ट्या मागास असलेले नेपाळी आणि आदिवासी हिंदू यांना लक्ष्य करत आहेत. यासाठी ते पारंपरिक बिहू नृत्याचा आधार घेऊन स्थानिकांना भुलवण्याचे काम ख्रिस्ती धर्मप्रचारक करत आहेत. तरुण युवक आणि युवती एकत्र येऊन करत असलेले ‘बिहू’ नृत्य हे आसामच्या मूळ संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून बिहू संगीत आणि गाण्यांच्या तालावर येशूचे गुणगान करणारी गाणी रचली गेली आहेत. बिहू पद्धतीच्या गाण्यांमध्ये येशूच्या नावाचा अंतर्भाव करून स्थानिक लोकांना आकर्षित करण्याचे काम ख्रिस्ती धर्मप्रचारक करत आहेत.

येशूची महती ठसवून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

उदलगुरी जिल्ह्यात ‘नेपाळी बापतिस्त ख्रिस्ती असोसिएशन’ने बिहू महोत्सव आयोजित केला होता. त्यात स्थानिक आसामी वाद्ये वाजवून त्याच्या तालावर येशूचे गुणगान करण्यात आले, यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. व्यावसायिक पद्धतीने बिहूचे चित्रीकरण करून त्याद्वारे येशूची स्तुती करणारी गाणी आता ‘यु ट्यूब’सारख्या सामाजिक माध्यमांवरही प्रसारित केली जात आहेत.

हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध होऊनही धर्मांतराच्या कारवाया चालूच !

सोनापूर भागात ख्रिस्ती धर्मप्रचारक मोठ्या प्रमाणात पैसे वाटून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. जे लोक पैसे घेण्यास नकार देतात त्यांना मुलांचे शिक्षण निःशुल्क देण्याचे प्रलोभन दिले जाते. मागील ३० वर्षांत सोनापूर भागात चर्चची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आदिवासी गरीब हिंदूंची फसवणूक करून होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आवाज उठवूनही या भागात ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतराचे प्रकार चालूच आहेत. (भाजपच्या राज्यात हे अपेक्षित नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंची संस्कृती आणि परंपरा यांचा वापर त्यांच्या धर्मांतरासाठी करणारे कावेबाज ख्रिस्ती ! अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतभर कठोर धर्मांतरविरोधी कायदा राबवून ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कारवाई करणे आवश्यक !
  • आसाममध्ये हिंदुत्वनिष्ठ हिमंत बिस्व सरमा यांची सत्ता असतांनाही ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कसलेच भय नाही, हे लक्षात घ्या. यावरून त्यांच्यामागे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शक्ती कार्यरत आहे, हे स्पष्ट होते अशांवर कठोर कारवाई केली, तरच त्यांच्या हिंदुविरोधी कारवाया बंद होतील !