‘मला (श्री. प्रकाश करंदीकर यांना) ६५ वर्षे आणि पत्नीला (सौ. छाया हिला) ६० वर्षे पूर्ण होत असल्याने ३.१.२०२२ या दिवशी आमच्या घरी आम्हा उभयतांची ‘मृत्यूंजय महारथी शांती’ करण्याचे ठरले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार विधीच्या आदल्या दिवशी प्रार्थना करणे आणि ग्रामदेवतेची ओटी भरणे
१ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी विधीचा साधनेच्या स्तरावर लाभ होण्यासाठी मार्गदर्शन करणे : ३.१.२०२२ या विधीच्या दिवशी आम्ही उभयता विधी करण्यात व्यस्त असणार; म्हणून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (माझा मुलगा श्री. सिद्धेश याच्या सासूबाई) यांनी आदल्या दिवशी, म्हणजे २.१.२०२२ या दिवशी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘सर्व चांगले होईल.’’ त्यांनी ‘विधीचा साधनेच्या स्तरावर लाभ होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयीही पुढील सूत्रे आम्हाला सांगितली.
१. त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांना प्रार्थना करा, ‘तुम्हीच आतापर्यंत आमच्याकडून सेवा आणि साधना करवून घेतलीत. उर्वरित आयुष्यातही आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना होऊ देत.’
२. यज्ञ आणि होम चालू असतांना देवता सूक्ष्मातून उपस्थित असतात. त्या वेळी ‘तुम्हाला काही जाणवते का ? अनुभूती येते का ?’, याकडे लक्ष ठेवा. निरीक्षण करा. काही जाणवले, तर वेळेची आणि अनुभूतीची नोंद करून ठेवा.
३. ‘पुरोहित कोणत्या देवतेचे श्लोक म्हणत आहेत ?’, याकडे लक्ष द्या. कळले नाही, तर गुरुजींना त्याचा अर्थ विचारून घ्या.
४. ‘गुरुदेवांना काय शिकवायचे आहे ?’, याचा सतत विचार करून निरीक्षण वाढवा. प्रत्येकाला सारखीच अनुभूती येईल, असे नाही. व्यक्तीला ज्या तत्त्वाची आवश्यकता असते, त्याची देव अनुभूती देतो. देव तुम्हाला नक्कीच अनुभूती देणार आहे.
५. ग्रामदेवतेच्या (श्री भगवतीदेवीच्या) देवळात जाऊन तिची नारळाने ओटी भरून तिला निमंत्रण देऊन प्रार्थना करा, ‘आमच्या घरी मंगल कार्य करण्याचे ठरवले आहे. तू सर्व देवतांना समवेत घेऊन त्या ठिकाणी ये. स्थानदेवता असल्याने ती सर्व देवतांना समवेत घेऊन येईल.’’
१ आ. आम्ही देवीची ओटी भरली, तिला निमंत्रण दिले आणि भावपूर्ण प्रार्थनाही केली.
१ इ. ‘देव काय अनुभूती देणार ?’, याची उत्कंठा वाटणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘हे सर्व इतक्या खात्रीपूर्वक का सांगत आहेत ?’, हे आम्हाला कळत नव्हते; पण त्या सांगत आहेत, तर ‘देव नक्कीच काहीतरी अनुभूती देणार’, अशी आमची श्रद्धा होती. आम्ही पूजेची सर्व सिद्धता भाव ठेवून केली. आम्ही सतत प्रार्थना करत होतो. ‘देव काय अनुभूती देणार ?’, याची आम्हाला उत्कंठा वाटत होती.
२. विधीच्या दिवशी आलेल्या अनुभूती
२ अ. पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी आणि पू. सदाशिव परांजपेआजोबा (श्री. सिद्धेशच्या आजेसासूबाई आणि आजेसासरे) घरी आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात अधिक चैतन्य जाणवत होते.
२ आ. आम्ही प्रार्थना केली, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार आम्हाला भाव ठेवून विधी करता येऊ देत. देवा, चैतन्याची अनुभूती कशी घ्यायची, ते तूच आम्हाला शिकव.’
२ इ. माती होमकुंडात पसरवत असतांना त्यात तांब्याची गणपतीची रेखीव मूर्ती सापडणे : विधीच्या आरंभी श्रीगणेश आवाहन आणि देवतापूजन झाले अन् नंतर पुण्याहवाचन झाले. हे विधी झाल्यावर होम करायचा होता. त्यासाठी मोठे होमकुंड आणले होते. गुरुजी म्हणाले, ‘‘त्या होमकुंडाच्या खालच्या भागात अंथरण्यासाठी माती आणा.’’ आम्ही आगाशीत लागवड केली असल्याने तेथे भरपूर माती उपलब्ध होती. माती होमकुंडात पसरवत असतांना माझ्या मेव्हण्यांना (श्री. मिलिंद चितळे यांना) त्या मातीत काहीतरी वेगळे जाणवले. त्यांनी गुरुजींना पहायला सांगितले. गुरुजींनी ते हातात घेऊन पाहिले असता त्यांना ‘ती एक मूर्ती आहे’, असे वाटले. मूर्तीला माती लागल्याने ती पाण्याने स्वच्छ केली. ती तांब्याची (तांबे या धातूची) गणपतीची सुंदर आणि रेखीव मूर्ती होती. ‘मूर्तीच्या मागील बाजूलाही चांदीची अजून एक लहान गणपतीची मूर्ती सिद्ध केली आहे’, असे लक्षात आले.
२ ई. पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी ‘घरी श्री गणेश अवतरला आहे आणि श्री गुरूंनी ‘ही फार मोठी अनुभूती दिली आहे’, असे सांगणे : पू. (सौ.) परांजपेआजींनी मूर्ती पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या घरी प्रत्यक्ष श्री गणेश अवतरला आहे. ही फार मोठी अनुभूती श्री गुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आज दिली आहे.’’ हे ऐकून घरातील प्रत्येक व्यक्तीची भावजागृती झाली. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ काल इतक्या खात्रीपूर्वक अनुभूतीविषयी का सांगत होत्या ?’, त्याचा उलगडा आम्हाला झाला.
३. मूर्तीचे ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरने) परीक्षण केल्यावर तिच्यात कोणतीही नकारात्मक ऊर्जा नसून चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पुढे घडणारी गोष्ट आधीच कळते’, याचा पुरावाच त्यांनी आम्हाला दिला. त्यांनी सांगितले, ‘‘आपण ही मूर्ती संशोधनासाठी आश्रमात पाठवूया.’’ आम्ही ती मूर्ती आश्रमात पाठवली. मूर्तीचे यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरने) परीक्षण केल्यावर आढळले, ‘मूर्तीमध्ये ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा किंवा ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा अशी कोणतीही नकारात्मक ऊर्जा नसून चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे आणि मूर्तीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ७.९२ मीटर आहे.’
‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’वाचकांना सूचना : या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.(हायपर लिंक देणे) |
४. मूर्ती देवघरात ठेवणे
अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणाल्या, ‘‘तुम्ही ही मूर्ती देवघरात ठेवू शकता.’’
आ. आमच्या देवघरातील गणपतीची मूर्ती थोडी खराब झाली होती. त्यामुळे आम्ही ती विसर्जित करून सनातनचे लहान आकारातील गणपतीचे चित्र देवघरात ठेवले होते. तिची पूजा करतांना माझ्या मनात विचार यायचा, ‘गणपतीची एखादी नवीन मूर्ती आणूया’; पण तशी कृती माझ्याकडून होत नव्हती. देवानेच घरी गणपतीची मूर्ती पाठवली. आता ती मूर्ती देवघरात पूजेत ठेवली आहे. प्रतिदिन पूजा करतांना ती गणेशमूर्ती पाहिली की, परात्पर गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) तीव्रतेने आठवण होऊन माझा भाव जागृत होतो.
५. कपाळावर लावलेल्या गंधात नृत्य करत असलेल्या गणपतीचा आकार उमटणे
देवपूजा करतांना मी नेहमी देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांना अष्टगंध लावतो. त्याच वेळी मी स्वतःच्या कपाळावरही अष्टगंध लावतो. ८.१.२०२२ या दिवशी सकाळी पूजा झाल्यावर ‘माझ्या कपाळावर लावलेल्या अष्टगंधात काही आकार उमटला आहे’, असे माझी नात कु. मोक्षदा कोनेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय १० वर्षे) हिच्या लक्षात आले. तिने लगेच भ्रमणभाषवर माझे छायाचित्र काढले. तेव्हा गंधात नृत्य करत असलेला गणपति स्पष्ट दिसत होता. ते पाहून माझा भाव पुष्कळ जागृत झाला.
‘३.१.२०२२ या दिवशी होमकुंडात गणपतीची मूर्ती सापडणे आणि ८.१.२०२२ या दिवशी कपाळावरील गंधात गणपतीचा आकार उमटणे, या दोन्ही अनुभूतींतून भगवंताला काय लक्षात आणून द्यायचे आहे ?’, असा विचार माझ्या मनात आला. ‘गुरुदेवा, तुमच्या अनंत कृपेमुळे मला या अनुभूती आल्या, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. प्रकाश वसंत करंदीकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२२.१.२०२२)
|