आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावामुळे पाक सरकारने ३० रुपयांनी वाढवले पेट्रोल-डिझेल यांचे दर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ७ दिवस चर्चा केल्यानंतर पाकला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक सरकारने नाणेनिधीच्या सांगण्यावरून पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात प्रति लिटर ३० रुपयांनी (पाकिस्तानी रुपये) वाढ केली आहे. त्यामुळे पाकमध्ये आता पेट्रोल १८० रुपये, तर डिझेल १७४ रुपये (पाकिस्तानी रुपये) प्रतिलिटर झाले आहे. एक भारतीय रुपया पाकिस्तानच्या २ रुपये ६१ पैसे मूल्याचा आहे.

१. अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, सरकारकडे इंधनाचे दर वाढवण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. आम्ही अजूनही प्रतिलिटर ५६ रुपये अनुदान देत आहोत.

२. इम्रान खान सरकार पडल्यानंतर नाणेनिधीने पाकला दिलेल्या ८ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा तिसरा हप्ता थांबवला होता. पाकला दोन हप्त्यांमध्ये अनुमाने २ अब्ज डॉलर मिळाले होते; पण ते इम्रान खान सरकारच्या काळात खर्च झाले.

३. सध्या पाकिस्तानची परकीय चलनाची गंगाजळी केवळ १२ अब्ज डॉलर्स आहे. यापैकी ९.५ अब्ज डॉलर्स सौदी अरेबिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या ठेवी आहेत. त्यांचा खर्च सरकार करू शकत नाही.