श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान धार्मिक विधी बंद करून व्यावसायिकपणा करत आहे ! – भोपे पुजारी मंडळाचा आरोप 

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २५ मे (वार्ता.) – शिर्डी, शेगाव आणि पंढरपूर यांप्रमाणे श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिराचा कारभार एकसमान होऊ शकत नाही. श्री तुळजाभवानीमाता ही कुलदेवता असल्याने येथे येणारा प्रत्येक भक्त हा कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी येतो. हा कुलधर्म, कुलाचार योग्य पद्धतीने व्हावा, याचे दायित्व मंदिर संस्थानचे आहे. असे असतांना ‘देऊळ कवायत कलम ३६’ चा चुकीचा अर्थ लावून सर्व धार्मिक विधी बंद करून केवळ व्यावसायिकपणा पाहिला जात आहे, असा आरोप श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. २५ मे या दिवशी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात ‘देऊळ कवायत कायदा’ आणि ‘देवीचे कुलधर्म कुलाचार’ यांसह मंदिरातील अनेक संदिग्ध विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली.

पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेली सूत्रे

१. तत्कालीन निजाम सरकारने वर्ष १९०९ मध्ये मंदिर प्रशासनासाठी बनवण्यात आलेल्या देऊळ कवायत नियमावलीचा आता सोयीस्कररित्या चुकीचा अर्थ काढून मंदिर संस्थान शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा, देवी भक्तांचे कुलधर्म कुलाचार बंद करत आहे.

२. यात भक्तांनी देवीला नेसवण्यासाठी आणलेली साडी न नेसवणे, देवघरातील मूर्तीची देवभेट न करणे, माळ परडीचा कुलाचार करू न देणे, आराध बसलेले कुटुंब आणि चाकरी करणार्‍या मंडळींना देवीचे दर्शन न देणे, चरणतीर्थ आणि प्रक्षाळपूजा या वेळी स्थानिक भाविकांना देवीचे दर्शन न देणे, असे अनेक कुलाचार आणि धार्मिक विधी यांत मोठ्या प्रमाणात मंदिर संस्थानचा हस्तक्षेप होत आहे.

३. देऊळ कवायतमध्ये ५६ कलमांचा समावेश आहे. यात कलम १३, ४८, ४९, ५३ आणि ५४ यांकडे मंदिर संस्थान जाणूनबुजून डोळेझाक करत आहे. या कलमात मंदिर संस्थानने जुन्या रूढी परंपरा जपायला हव्यात. शासन आदेश किंवा न्यायालयाच्या आदेशाविना जुन्या रूढीपरंपरा मोडल्या जावू नयेत, असे म्हटले आहे. असे असतांना जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढून कलम ३६ चा हवाला देवून छत्रपती संभाजीराजेंना मागील सप्ताहात देवीच्या दर्शनास गाभार्‍यात जाण्यापासून वंचित ठेवले गेले. या घटनेमुळे मंदिर संस्थानचा जाहीर निषेध भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.