शहरांचे नामकरण कधी ?

आगामी होणार्‍या संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण आणि संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्यावरून राजकारण चालू झाले आहे. निवडणुका आल्या की, ‘संभाजीनगर’च्या नामकरणाचे सूत्र चर्चेला येते. इतर वेळी मात्र सर्व राजकीय पक्ष हे सूत्र सोयीस्कररित्या विसरतात, असेच चित्र गेली अनेक वर्षे दिसत आहे. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या पार्श्वभूमीवर ‘औरंगजेबाच्या थडग्याचे पर्यटकांना दर्शन देऊ नये’, अशी मागणी आता स्थानिक नागरिकच करत आहेत.

मोगल बादशहा औरंगजेबाने देशातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांची संपत्ती लुटली, मंदिरांच्या ठिकाणी अनेक मशिदी उभ्या केल्या, लाखो हिंदूंची हत्या करून हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार केले, असा इतिहास सर्वश्रुत आहे. असे असतांनाही महाराष्ट्रातील शहराला ‘औरंगाबाद’ असे नाव आणि तेथे त्याचे थडगेही आहे. एवढेच नव्हे, तर या थडग्याचे ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील हे उदात्तीकरण करतात, हे संतापजनक अन् लाजिरवाणे आहे.

खासदार इम्तियाज जलील

कोणत्याही शहराचे नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य आणि केंद्र सरकार यांची मान्यता, अशी प्रक्रिया असते. तसा विचार केल्यास ही प्रक्रिया करून आतापर्यंत मोगलांनी शहरांच्या माध्यमातून निर्माण केलेले त्यांचे अस्तित्व संपवणे आवश्यक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि इस्लामपूर या शहरांचे नामकरण देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही होत नसेल, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करू शकू का ? त्यांच्यासारखा पराक्रम गाजवू शकू का ?

वर्ष २०२० मध्ये औरंगाबाद विमानतळाचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. महानगरपालिकेनेही ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’, असे नाव करण्याविषयीचा ठराव संमत केला; मात्र अजूनही केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही. नामकरणाची ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.