‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

नवी देहली – ‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी देहली येथे एका कार्यक्रमात केले. सर्व शाळांमध्ये सामान्य शिक्षणावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सरमा पुढे म्हणाले, ‘‘जोपर्यंत ‘मदरसा’ शब्द असेल, तोपर्यंत विद्यार्थी आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता आदी बनण्याचा विचारही करू शकणार नाहीत. मुसलमानांनी  त्यांच्या पाल्यांना कुराण शिकवावे; परंतु ते स्वतःच्या घरी. विद्यार्थ्यांना मदरशांत भरती करणे, हे त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. विद्यार्थ्यांचा विज्ञान, गणित, जैव विज्ञान, वनस्पती विज्ञान आदी शिकण्याकडे ओढा असला पाहिजे. मदरशांत शिकणारे विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. त्यांना कुराणातील प्रत्येक शब्द पाठ असतो. भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदू होते. एकही मुसलमान भारतात जन्मलेला नाही. भारतात प्रत्येक जण हिंदूच होता. त्यामुळे मुसलमान विद्यार्थी जर हुशार असतील, तर मी काही प्रमाणात त्याचे श्रेय त्यांच्या हिंदु पूर्वजांना देईन.’’

वर्ष २०२० मध्ये आसाम सरकारने धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार करत एका वर्षात राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करून त्यांचे रूपांतर सामान्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा निर्णय घेतला. गौहत्ती उच्च न्यायालयानेही आसाम सरकारचा हा निर्णय कायम ठेवला आहे.

संपादकीय भूमिका

भाजपशासित अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही अशी रोखठोक भूमिका घेऊन खर्‍या अर्थाने विकास साधला पाहिजे !