केवळ व्यावसायिक हेतूने कुणी या वास्तूचा वापर करत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही ! – उदयनराजे भोसले

पुणे येथील लाल महालमध्ये लावणी नृत्य केल्याप्रकरणी नृत्यांगना वैष्णवी पाटीलसह ४ जणांवर गुन्हा नोंद !

पुणे – लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण करणे आवश्यक आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कुणी या वास्तूचा वापर करत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. पुणे येथील लाल महालात वैष्णवी पाटील या नृत्यांगनेने लावणी सादर करून हे चलचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्यावर उदयनराजे भोसले यांनी यावर थेट चेतावणी दिली आहे. या प्रकरणी आता नृत्यांगना वैष्णवी पाटीलसह ४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भोसले पुढे म्हणाले की, मुळात ही वास्तू पुणे महानगरपालिकेच्या कह्यात असून या चित्रीकरणासाठी महापालिकेची रितसर अनुमती घेतली आहे का ? महापालिकेच्या कोणत्या अधिकार्‍यांनी ही अनुमती दिली ? अनुमती दिली असेल तर कोणत्या अटी आणि शर्तींवर दिली ? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे ? त्याचबरोबर जे चित्रीकरण झाले असेल ते पडताळून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही खासदार उदयनराजेंनी केली आहे.

‘राष्ट्रीय क्षत्रिय जन संसदे’चे महेश पाटील म्हणाले, ‘‘लाल महालातील घडलेला प्रकार हा जाणूनबुजून घडवण्यात आला आहे. क्षमा मागून हा विषय मिटणारा नाही. सवंग लोकप्रियतेसाठी वा प्रसिद्धीसाठी काहीही करणार्‍यांना कायमचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.’’

लाल महालाबाहेर २१ मे या दिवशी शिवसेनेकडून वैष्णवी पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, तर भाजपने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी नृत्यांगना वैष्णवी पाटील यांच्यासह ‘कोरिओग्राफर’ केदार अवसरे यांनीही जाहीर क्षमा मागितली आहे.