न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्याविषयी सांगितलेले त्यांचे मत आहे, न्यायालयाचा निकाल नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे – न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्याविषयी जे सांगितले, ते मत आहे, तो न्यायालयाचा निकाल नाही. न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल, तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला निश्चिती आहे की, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. त्यांचा चुकीच्या लोकांसमवेत संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही. (न्यायालय जेव्हा जाहीररित्या एखादे मत नोंदवते तेव्हा ते त्यांच्यासमोर असलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारेच ! असे असूनही देशद्रोही दाऊद इब्राहिमशी संबंध पुढे आल्यानंतरही नवाब मलिक यांची पाठराखण करणे म्हणजे थेट गुन्हेगारी संबंधांची पाठराखण केल्यासारखे आहे ! हेच शरद पवार उद्या न्यायालयाने निकाल दिल्यावर तो खालच्या न्यायालयाचा निकाल आहे अद्याप सर्वाेच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही, असे म्हणतील ! त्यामुळे अशा प्रकारे थेट देशद्रोह्यांशी संबंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढील निवडणुकांमध्ये मतदान करायचे का ? याचा जनतेने विचार करणे अत्यावश्यक आहे ! – संपादक)

आरोपी हा थेट आणि सर्व माहिती असूनही मनी लाँड्रींगमध्ये सहभागी ! – विशेष न्यायालयाचे निरीक्षण

नवाब मलिक यांच्या संदर्भात विशेष न्यायाधीश राहुल एन्. रोकडे यांनी म्हटले आहे की, आरोपी नवाब मलिक यांनी ‘डी’ कंपनीचे सदस्य असणार्‍या हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासमवेत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली. मलिक यांनी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर आणि इतर सहकारी यांच्या साहाय्याने भूमी बळकावल्याने त्यांच्या विरोधात ‘मनी लाँड्रींग’विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करता येईल. या सर्वांनी या गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न हे अवैधरित्या मिळवले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असे दिसून येते की, आरोपी हा थेट आणि सर्व माहिती असूनही ‘मनी लाँड्रींग’मध्ये (अवैधरित्या आणि अवैध मार्गाने पैशांची देवाण-घेवाण) सहभागी होता. त्यामुळेच तो ‘पी.एम्.एल्.ए.’ अंतर्गत येणार्‍या तिसर्‍या कलमाअंतर्गत ‘मनी लाँड्रींग’च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरतो, तसेच कलम ४ नुसार शिक्षेस पात्र ठरतो, असे वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडियाने’ दिले आहे.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा भरणा असलेला आणि त्याचे समर्थन करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष !