१. श्रीराम यागाच्या शेवटच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या केसांचा अंबाडा सोडल्यावर ‘त्यांचे केस प्रत्यक्षात आहेत, त्यापेक्षाही पुष्कळ लांब असून ‘देवीचा केशसंभार पहात आहे’, असे जाणवणे : रामनाथी आश्रमात झालेल्या श्रीराम यागाच्या शेवटच्या दिवशी यागानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ नेहमीप्रमाणे सेवा करत होत्या. मी एका सेवेनिमित्त रात्री त्यांच्याकडे गेले. तेव्हा माझे लक्ष त्यांच्या अंबाड्याकडे आणि त्यावर घातलेल्या फुलांच्या वेणीकडे गेले. माझ्याशी बोलतांना त्यांनी अंबाड्यावर घातलेली फुलांची वेणी काढून माझ्या हातात (मला चैतन्य मिळण्यासाठी) दिली. नंतर त्या केसांचा अंबाडा सोडू लागल्या. चित्रीकरणाच्या दृष्टीने अंबाडा नीट बसण्यासाठी त्या गंगावन लावतात. गंगावन केसांतून काढतांना त्या माझ्याशी बोलत होत्या. तेव्हा त्यांचे केस प्रत्यक्षात आहेत, त्यापेक्षाही पुष्कळ लांब असून ‘मी देवीचा केशसंभार पहात आहे’, असे मला जाणवत होते. ते दृश्य फारच विलोभनीय होते.
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वापरलेल्या गंगावनाविषयी आलेल्या अनुभूती
१ आ १. अंबाड्यासाठी वापरलेले गंगावन हातात घेतल्यावर त्यात शक्ती आणि चैतन्य जाणवणे : थोड्या वेळाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना साहाय्य करणारी साधिका तेथे आली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ते गंगावन व्यवस्थित गुंडाळी करून तिच्याकडे दिले. त्यांनी मला ‘हे गंगावन हातात घेऊन काय जाणवते ?’, ते पहा’, असे सांगितले. गंगावन हातात घेतल्यावर मला पुष्कळ शक्ती जाणवली. ‘शक्तीच्या वेगवान लहरी माझ्या हातातून शरिरात जात आहेत आणि मला त्यातील शक्ती अन् चैतन्य पेलवत नाही’, असे जाणवत होते.
१ आ २. गंगावनाचे केस मऊ आणि जिवंत वाटणे अन् त्याचा काळेपणा नैसर्गिक वाटणे : एरव्ही गंगावनाचे केस कृत्रिम आणि रुक्ष वाटतात. त्यात एक प्रकारचा निर्जीवपणा जाणवतो; मात्र या गंगावनाचे केस मला मऊ आणि जिवंत वाटत होते. मला त्याचा काळेपणाही नैसर्गिक वाटत होता. त्यांनी तेथे असलेली साधिका सौ. वैदेही गौडा हिलाही ‘गंगावन हातात घेऊन काय जाणवते ?’, हे पहायला सांगितले. तेव्हा तिला त्यात शक्ती जाणवली आणि ‘गंगावनाला वजन नसून ते अतिशय हलके आहे’, असेही जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील दैवी गुणांचे घडलेले दर्शन !
२ अ. अहंशून्यता
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘गंगावनातील केसांचा मऊपणा यागाच्या चैतन्यामुळे आला आहे’, असे सांगून त्याचे श्रेय स्वतःकडे न घेणे : ‘गंगावन हातात घेतल्यावर आम्हा दोघींना काय जाणवले ?’, हे आम्ही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले. मी म्हटले, ‘‘तुमच्यातील चैतन्यानेच या गंगावनात पालट झाला आहे.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘त्यात यागाची शक्ती साठलेली असते, ती तुम्हाला जाणवली. यागातील चैतन्यामुळेच गंगावनातील केसांना मऊपणा आला आहे.’’ स्वतःकडे कोणतेही श्रेय न घेता त्या सहजतेने आम्हाला यागातील शक्ती आणि चैतन्य यांविषयी सांगत होत्या.
२ आ. प्रीती
यज्ञस्थळी न बसताही फुलांची वेणी आणि गंगावन यांद्वारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यागाचे चैतन्य देणे : माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मी नकारात्मक विचार करत होते. मला यागातील चैतन्य मिळण्यासाठी यज्ञस्थळी बसणे आवश्यक असूनही सेवेचा ताण घेतल्याने मी तेथे बसले नव्हते. ‘मी यज्ञस्थळी बसले नाही’, तरी वरील प्रसंगातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला ‘यागाचे चैतन्य दिले’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ इ. सतर्कता
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीत पंख्यातून नाद ऐकू येणे, त्यांनी तो नाद ऐकून ‘पंखा किती गतीवर फिरत असतांना नाद येतो ?’, हे पाहून तसा साधकाला निरोप देण्यास सांगणे : थोड्या वेळाने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात, त्या खोलीत नाद ऐकू आला. ‘तो नाद कुठून येत आहे ?’, हे पाहिल्यावर ‘खोलीतील पंख्यातून तो येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. रात्री वातावरण शांत असल्याने मला नाद व्यवस्थित ऐकू येत होता. मी त्यांना तसे सांगितल्यावर त्यांनीही डोळे मिटून तो नाद ऐकला. त्या मला म्हणाल्या, ‘‘नाद ऐकतांना ध्यान लागते. ‘पंखा किती गतीवर फिरत आहे ?’, ते पाहून ही गोष्ट श्री. सत्यकाम कणगलेकर यांना सांग.’’ त्यांनी मला असे सांगितले नसते, तर पंख्याची गती पहायचे माझ्या लक्षातही आले नसते. त्यांच्याकडून या कृती पुष्कळ सहजतेने होत होत्या.
प्रार्थना
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुस्थानी आहेत; मात्र त्यांची शिष्या म्हणून माझ्यात गुण नाहीत. मी कितीही चुका केल्या, तरी त्या मला विविध माध्यमांतून घडवतात. त्यांच्या अशा अनेक कृतींतून मला त्यांची प्रीती अनुभवता येते. तेव्हा माझे कृतज्ञतेचे अश्रू थांबत नाहीत. मला पुष्कळ अपराधी वाटते. ‘हे गुरुराया, ‘अपराधी वाटणे’ हे केवळ मनाच्या स्तरावर न रहाता आपल्याला अपेक्षित अशी सेवा आणि साधना होण्यासाठी शरणागत राहून माझ्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न करून घ्या’, ही प्रार्थना !
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२५.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |