नायजेरियात प्रेषितांचा अवमान केल्याचे सांगत ख्रिस्ती विद्यार्थिनीची मुसलमान विद्यार्थ्यांकडून हत्या

सोकोटो (नायजेरिया) – येथील एका ख्रिस्ती विद्यार्थिनीची मुसलमान विद्यार्थ्यांच्या जमावाने हत्या करून तिचा मृतदेह जाळला. प्रेषित पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे निमित्त करत धर्मांधांनी तिची हत्या करण्यापूर्वी तिला बेदम मारहाण केली. या घटनेने संपूर्ण देश आणि जग हादरले आहे. कानो राज्यातील सोकोटो शहरात ही घटना घडली.

१. येथील देबोराह सॅम्युअल या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या व्हाट्सअप गटात एक पोस्ट प्रसारित केली. संबंधित व्हाट्सअप गट हा केवळ महाविद्यालयातील अभ्यासक्रमाशी संबंधित सूत्रांच्या देवाण-घेवाणासाठी असतांना काही मुसलमान विद्यार्थी धार्मिक पोस्ट करत असल्याने देबोराह सॅम्युअल हिने त्यावर आक्षेप घेत एक ध्वनीमुद्रण (ऑडिओ) प्रसारित केले.

२. या ध्वनीमुद्रणात प्रेषित महंमद पैगंबर यांच्यासंबंधी टिप्पणी असल्याचे निमित्त करत मुसलमान विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाने देबोराह सॅम्युअल हिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु धर्मांधांनी तिला खेचून बाहेर आणले.

३. स्थानिक पत्रकारांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मुसलमान विद्यार्थी देबोराह सॅम्युअल हिला खाली पाडून तिला काठ्यांनी मारहाण करत, दगडांनी मारत असल्याचे दिसत आहे.  या वेळी विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’च्या (अल्ला महान आहे, अशा) घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांतील काही मुसलमान विद्यार्थ्यांनी देबोराहवर टायर टाकून तिला पेटवून दिले.

४. ‘ख्रिस्त्यांनी प्रेषितांचा अवमान केल्यास त्यांच्यावर आणखी आक्रमणे होऊ शकतात’, अशी गर्भित धमकी अनस महंमद सानी या सरकारी अधिकार्‍याने दिली आहे.

५. नायजेरियामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान यांची संख्या जवळपास समान आहे. वरील घटना ही नायजेरियाच्या उत्तर भागात घडली असून अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयुक्तांच्या अहवालाप्रमाणे या भागातील १२ राज्यांत वर्ष १९९९ पासून शरीयत कायदा लागू झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.