हिंदूंनो, संस्कारांची कट्टरता शिकायची असेल, तर मुसलमानांचा आदर्श घ्या !

मध्यप्रदेशातील मंत्री उषा ठाकूर यांचे हिंदूंना अंतर्मुख करायला लावणारे वक्तव्य !

मंत्री उषा ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – आपल्या मुलांवर दृढ आणि कट्टरतेचे धार्मिक संस्कार करणे, हे पालकांचे अन् कुटुंबाचे दायित्व आहे. जर तुम्हाला संस्कारांची कट्टरता शिकायची असेल, तर मुसलमानांचा आदर्श घ्या ! आम्हाला गावात मंदिर बांधण्याची आवड आहे; पण आरतीला जाण्यात रस नाही. चौकाचौकात बसून गप्पा मारणार; पण मंदिरात जाणार नाही, असे वक्तव्य भाजप सरकारमधील पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी केली. खंडवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदूंनी मुसलमानांकडून आदर्श घ्यावा ! मुसलमानांना दिवसातून पाच वेळा नमाज वाचण्यासाठी कुणी बोलवायला जाते का ? नाही ! तरी ठरलेल्या वेळी मुसलमान आपापली सर्व कामे सोडून टोपी घेऊन नमाजासाठी पोचतात. मग ती लहान मुले असो वा मोठी, अधिकारी असो वा व्यापारी.’’