तीव्र शारीरिक त्रासांत स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोषांवर मात करून अल्प कालावधीत मृत्यूपूर्वी निर्विचार स्थिती साध्य करणारे नाशिक येथील कै. मुकुंद ओझरकर !

श्री. राम होनप
कै. मुकुंद ओझरकर

१. वर्ष २००३ पासून जवळीक असूनही श्री. ओझरकर यांच्याशी अल्प प्रमाणात संपर्क होणे आणि निधनापूर्वी ६ मास त्यांना अनेक वेळा संपर्क करण्याची इच्छा आपोआप होणे

‘नाशिक जिल्ह्यात असतांना वर्ष २००३ पासून माझा श्री. ओझरकरकाका यांच्याशी संपर्क आला. तेव्हापासून आमची जवळीक झाली. वर्ष २००४ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी नाशिकहून गोवा येथे आलो. त्यानंतर त्यांच्याशी माझा भ्रमणभाषद्वारे अल्प प्रमाणात संपर्क व्हायचा. वर्ष २०२२ मध्ये ओझरकरकाका यांच्या निधनापूर्वी ५ – ६ मासांपासून मला त्यांना संपर्क करण्याची इच्छा आपोआप व्हायची. त्या कालावधीत त्यांच्याशी अनौपचारिक आणि साधनेच्या संदर्भात बोलणे व्हायचे.

२. काकांना निधनापूर्वी १ मास स्वतःतील नकारात्मक विचारांची जाणीव झाल्यावर तीव्र शारीरिक त्रास होत असतांना त्यांनी त्यावर मात करण्यास प्रारंभ करणे

एप्रिल २०२२ मध्ये काकांनी त्यांच्या मनात पूर्वीपासून असलेले काही नकारात्मक विचार मला मोकळेपणाने सांगितले, तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘मनातील नकारात्मक विचार हे मनात अढी बनून रहातात आणि त्यामुळे कुठल्याही साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचा वेग मंदावतो. फुगा वजनाने हलका असल्याने तो आकाशात वेगाने वर प्रवास करतो, तसे साधकाने स्वतःतील स्वभावदोष दूर केले की, तो वेगाने ईश्वराकडे वाटचाल करतो. साधकाने आयुष्यभर साधना करून मृत्यूनंतर उच्चलोक प्राप्त केला, तरी या नकारात्मक विचारांमुळे साधकाला पृथ्वीवर परत जन्म घ्यावा लागू शकतो. त्यामुळे मनातील नकारात्मक विचार स्वयंसूचनेने काढल्यास आपली आध्यात्मिक प्रगती पृथ्वीवर होते, तसेच मृत्यूनंतर वरच्या सूक्ष्म लोकांतही वेगाने चालू रहाते. एकदा आपल्यातील स्वभावदोष गेले की, मग केवळ आनंदच शिल्लक रहातो.’’

हे ऐकून काका स्वभावदोष-निर्मूलनाच्या संदर्भात गंभीर झाले आणि मला म्हणाले, ‘‘मी मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी प्रयत्न करतो.’’ हे संभाषण चालू असतांना मला सूक्ष्मातून जाणवत होते, ‘काकांच्या निधनाची वेळ जवळ आली असून त्यांच्या मनातील स्वभावदोषांचे अडथळे दूर झाल्यास त्यांची पुढील साधना वेगाने होणार आहे’; परंतु या विषयी मी कुणालाही सांगितले नाही.

३. प्रकृती खालावलेली असतांनाही स्वयंसूचनांद्वारे स्वतःतील नकारात्मक विचार दूर करून अल्पावधीत निर्विचार अवस्था साध्य करणे

२.५.२०२२ या दिवशी ओझरकरकाका यांनी मला भ्रमणभाष केला आणि मला म्हणाले, ‘‘मला उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक त्रास होत असल्याने मी रुग्णालयात भरती होतो. काल मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर स्वयंसूचना दिल्या. त्याचा मला पुष्कळ लाभ झाला. नकारात्मक विचार दूर झाल्याने माझे मन निर्विचार झाले आहे. ‘ही स्थिती आता परत कधीच ढळू नये’, असे वाटते.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘छान अनुभूती आली.’’ त्यानंतर ७.५.२०२२ या दिवशी काकांचे निधन झाल्याचे मला समजले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१२.५.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.