गुरुपीठाने अपहाराचे आरोप फेटाळले !
नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसिद्ध ‘श्री स्वामी समर्थ केंद्रा’चे प्रमुख श्री. श्रीराम खंडराव उपाख्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावर तब्बल ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी हा आरोप करत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. श्री. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ही तक्रार करतांना अमर पाटील यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल पुरावा म्हणून जोडला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी धर्मादाय आयुक्तांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवल्याची माहिती हाती आली आहे. हा अहवाल आल्यानंतर श्री. मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करायचा कि नाही, याविषयीचा निर्णय पोलीस घेतील; मात्र ‘तक्रारदार अमर पाटील यांनी केवळ आर्थिक स्वार्थापोटी असा आरोप केला आहे’, असा दावा ‘अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठा’ने केला आहे.
५० कोटी ६८ लाख ६९ सहस्र २२१ रुपयांचा अपहार !
त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक प्रसिद्ध धर्मादाय संस्था आहे. देशातील भाविकांची संस्थेवर श्रद्धा आहे. श्री. अण्णासाहेब मोरे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी इतर सदस्यांशी संगनमत करून ५० कोटी ६८ लाख ६९ सहस्र २२१ रुपयांचा अपहार केला आहे, अशी तक्रार पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ केंद्र हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचा श्रद्धेचा विषय असून श्री. मोरे यांचा शिष्यवर्गही मोठा आहे.
तक्रारीत करण्यात आलेला आरोप !
धर्मादाय संस्थेचा निधी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे; परंतु श्री स्वामी समर्थ गुरुपिठाच्या विश्वस्तांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी संगनमताने फौजदारी स्वरूपाची कट कारस्थान करून १ कोटी ४४ लाख ९३ सहस्र ५६० रुपये बँकेत जमा न करता विविध कारणांसाठी वापरून त्यांचा अपहार केला आहे, असा दावा तक्रारदार अमर पाटील यांनी केला आहे, तसेच धर्मादाय आयुक्तांचे नियम डावलून आणि विना निविदा कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.
लेखापरीक्षणाविषयीच्या तक्रारींत तथ्य नाही !
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथील दिंडोरी दरबारचे व्यवस्थापक श्री. गिरीश मोरे म्हणाले, ‘‘तक्रारदारांनी वैयक्तिक अथवा तत्सम द्वेषापोटी हे आरोप केले आहेत. आरोपात तथ्य असते, तर आतापर्यंत धर्मादाय आयुक्त अथवा पोलीस निरीक्षक यांनी आमच्यावर कारवाई केली असती. आमच्या वडिलोपार्जित भूमी आहेत आणि त्यांची सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. ट्रस्टचे सर्वच कामकाज आतापर्यंत नियमानुसारच झालेले आहे. लेखापरीक्षणाविषयी केलेल्या तक्रारींत कोणतेही तथ्य नाही.’’
अपहार झाल्याविषयी पडताळूनच पुढील कार्यवाही करू !
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले, ‘‘लेखापरीक्षणात काही त्रुटी आहेत का किंवा त्यातून अपहार झाला आहे का ? झाला असल्यास किती आणि कसा झाला आहे ?, या संदर्भातील तथ्य पडताळूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल.’’