कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शस्त्र प्रशिक्षण दिले गेल्याचा दावा !

बेंगळुरू (कर्नाटक) – सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झालेली काही छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचा संदर्भ देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शस्त्र प्रशिक्षण दिले गेल्याचा दावा करण्यात आला. या कार्यकर्त्यांनी हातात ‘एअर गन’ आणि त्रिशूळ धरले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, ५ ते ११ मे या कालावधीत कर्नाटकातील कोडगू येथे हे प्रशिक्षण ‘शौर्य प्रशिक्षणवर्ग’ या नावाने देण्यात आले.

याविषयी बोलतांना बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, शिबिरार्थिंना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात आले असून कुणालाही शस्त्रे पुरवण्यात आलेली नाहीत. दुसरीकडे काँग्रेसने मात्र यास विरोध करत ‘बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शस्त्रपरवाना नसतांना त्यांना त्याचे प्रशिक्षण कसे काय दिले गेले ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार प्रविष्ट केलेली नाही.