|
ठाणे, १५ मे (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत लिखाण प्रसारित करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे यांना ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना १५ मे या दिवशी ठाणे न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी त्यांना न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित करतांना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१. या लिखाणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध ठिकाणी असलेले कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी यांना ठाणे न्यायालयात उपस्थित करतांना मागच्या दराने आणण्यात आले. तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या; पण कडक पोलीस बंदोबस्त असल्याने महिला कार्यकर्त्यांनी केतकी यांच्यावर फेकण्यासाठी आणलेली अंडी फेकता न आल्याने त्यांनी अंडी रस्त्यावर फेकून तिचा निषेध केला.
२. केतकी यांनी न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्यासाठी कोणत्याही अधिवक्त्याची नियुक्ती केली नाही. केतकी यांनी न्यायालयात स्वतःची बाजू मांडतांना ‘समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का ?’, असा प्रश्न उपस्थित केला.
३. केतकी यांच्याविरुद्ध आतापर्यंत ९ हून अधिक पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंबईतील पवई आणि गोरेगाव पोलीस ठाणे, अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाणे. नाशिक येथील सायबर गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला येथेही त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद झाले आहेत.
संपादकीय भूमिकाकेतकी यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या त्या कवितेत ‘तुका म्हणे’ हा शब्द वापरण्यात आला होता. त्याला देहू संस्थानने आक्षेप घेतला आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी देहू संस्थानने देहूरोड पोलिसांना पत्र लिहिले आहे. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून त्यांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे’, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. |