सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य !
‘गुरु-शिष्य’ नाते हे जगातील सर्वाेत्कृष्ट नाते आहे. गुरूंचे कार्य शिष्य आणि समाज यांच्यापर्यंतच सीमित असते; पण ईश्वराचा अवतारच ‘गुरु’ या रूपात प्रकट झाला, तर ‘त्याचे कार्य कसे असेल ?’, याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे अलौकिक कार्य !’ आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, हे या लेखांतून क्रमशः जाणून घेणार आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/579873.html
१. ‘लोकसंग्रह करून प्रत्येकाच्या कौशल्यानुसार त्याला योग्य साधनेचा मार्ग दाखवून त्याच्या साधनेला प्रेरित करणे’, हे अवताराचे कार्य असणे
अवतार पृथ्वीवर आल्यावर तो लोकांपासून दूर रहात नाही. तो लोकांमध्ये राहून लोकसंग्रह करतो. तो सर्व प्रकारच्या लोकांना भेटतो, त्यांना आनंद देतो आणि त्यांना साधनेला प्रेरित करतो. ‘लोकसंग्रह करणे आणि त्या त्या लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्य साधनेचा मार्ग दाखवणे’, हे अवताराचे कार्य आहे. श्रीरामाचा जन्म राजघराण्यात झाला. त्याने वानर, ऋषी-मुनी, राजे-महाराजे, सामान्य प्रजा यांच्याकडून कार्य करवून घेतले. श्रीकृष्णाने गोपालकांच्या घराण्यात जन्म घेतला. त्याने गोप-गोपी, पांडव आणि कौरव, अनेक राजे-महाराजे आणि सामान्य प्रजा यांच्याकडून कार्य करवून घेतले.
२. कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवलेयांनी लोकसंग्रह करण्यासाठी ‘सनातन संस्था’ नावाच्या संस्थेची स्थापना करणे आणि ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र चालू करणे
श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी लोकसंग्रहाचे कार्य करण्यासाठी त्यांच्या राजाधिकाराचा मार्ग निवडला, तर आता कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लोकसंग्रह करण्यासाठी ‘सनातन संस्था’ नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक चालू केले. या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लोकांमध्ये मिसळणारे साधक, संत अन् धर्मप्रचारक सिद्ध केले आहेत. हे साधक आणि संत म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लोकसंग्रहाचे माध्यम होय.
३. ‘लोकसंग्रहाचे उत्तम कार्य करवून घेणे’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले होय !
वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम सोडून अन्य कुठेही गेलेले नाहीत. ‘अवतार कुठेही न जाता लोकसंग्रहाचे उत्तम कार्य कसे करवून घेतो’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले होय ! उत्तम धर्मप्रचारक साधक सिद्ध करून त्यांना समाजात पाठवून त्यांच्याकडून गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) १००० पेक्षा अधिक ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेतल्या आहेत. त्या माध्यमातून हिंदु समाजातील लाखो धर्मप्रेमी धर्मरक्षणाच्या कार्यात जोडले गेले आहेत. ज्या कार्यामध्ये धर्माचे अधिष्ठान आणि ईश्वराचे पाठबळ असते, तेच कार्य यशस्वी होते. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे हिंदु जनजागृती समिती असे कार्य करत आहे.
४. ‘एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक लोकांना प्रेरणा देऊन आणि मार्गदर्शन करून लोकक्रांती घडवून आणणे’, हे अवताराचे वैशिष्ट्य असणे
अवताराचे हे वैशिष्ट्य आहे, ‘तो ‘लोकक्रांती’ घडवून आणतो’; म्हणजे ‘एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक लोकांना प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे आणि मार्गदर्शन करणे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आतापर्यंत कला, नृत्य, नाट्य, संगीत, आध्यात्मिक संशोधन, वृत्तपत्रसृष्टी, व्यापार, राज्य-राष्ट्र व्यवस्थापन, वैद्यकीय, न्यायप्रणाली आदी अनेक क्षेत्रांतील लोकांना ईश्वरप्राप्तीकडे वळवले आहे. त्यांना प्रेरणा दिली असून सतत मार्गदर्शन केले आहे. ‘हे सर्व सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नसून हे अवतारी कार्य आहे’, हे वेगळे सांगायला नको !
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१०.५.२०२२)
(क्रमश:)