परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य

‘गुरु-शिष्य’ नाते हे जगातील सर्वाेत्कृष्ट नाते आहे. गुरूंचे कार्य शिष्य आणि समाज यांच्यापर्यंतच सीमित असते; पण ईश्वराचा अवतारच ‘गुरु’ या रूपात प्रकट झाला, तर ‘त्याचे कार्य कसे असेल ?’, याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे अलौकिक कार्य !’ आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, ते हे या लेखातून क्रमशः जाणून घेणार आहोत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक अवतारी कार्य म्हणजे ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले

जन्म आणि मृत्यू यांचे महाचक्र म्हणजे भर अंधारात महासागराच्या मध्यभागी एका होडीत सापडल्यासारखे आहे. अवतार जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ पहाणाऱ्या जिवांना मार्ग दाखवण्याचे कार्य करतो. काळानुसार वेगवेगळ्या योगमार्गांची निर्मिती करून अवतार त्या योगमार्गाने जाणाऱ्या जिवांना त्याचे फळही देतो. ‘ज्ञानयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, कर्मयोग आदी मार्गांनी कलियुगात साधना करणे कठीण आहे’, हे जाणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती केली. योगमार्गाची निर्मिती करणे, म्हणजे एका नवीन सूर्याची निर्मिती करून त्याला प्रतिदिन प्रकाशमान करण्यासारखे आहे. असे कार्य केवळ ईश्वराचा अवतारच करू शकतो.

२. गुरुकृपायोगानुसार साधना करून साधकांची शिष्य ते संत आणि सद्गुरु अशी होत असलेली आध्यात्मिक वाटचाल !

श्री. विनायक शानभाग

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाची निर्मिती करून त्यामध्ये काळानुसार आवश्यक ते पालटही केले आहेत. (साधकांच्या स्थितीनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अष्टांग साधनेच्या टप्प्यांचा क्रम पालटला.) जगातील सहस्रो जिज्ञासूंनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करून अनेक अनुभूती घेतल्या आहेत. गुरुकृपायोगानुसार साधना करून अनेक साधकांनी शिष्य ते संत आणि सद्गुरु अशी आध्यात्मिक वाटचाल केली आहे. एखादा योगमार्ग ईश्वरनिर्मित असेल, तर त्यानुसार साधना करून साधक जिवांना अनुभूती येतात आणि ईश्वरप्राप्ती होते. ‘गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने ईश्वराची अनुभूती येते’, हे आतापर्यंत सनातनच्या अनेक साधकांनी अनुभवले आहे आणि हेच परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारी कार्य आहे.’

(क्रमशः)

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (१०.५.२०२२)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/579996.html