रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येतील मठ, मंदिरे आणि धर्मशाळा यांना करमुक्त करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी अयोध्येच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी याची घोषणा केली होती. मुळात ‘मंदिरांवर कर कसा काय ?’ हा सर्वसाधारण भाविकांना पडलेला गहन प्रश्न आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. हिंदु संस्कृतीचे रक्षण, संवर्धन अन् प्रसार करण्यासाठी गेली सहस्रावधी वर्षे मंदिरांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्थूल डोळ्यांनी आणि मनाने अनुभवता येईल, अशा या महत्त्वासह सूक्ष्मातून या सूत्राकडे पाहिल्यास ‘मंदिरे ही ईश्वरी चैतन्याचे स्रोत आहेत’, हे कळून येईल. त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या सात्त्विकतेच्या प्रभावामुळेच असंख्य इस्लामी आक्रमक हिंदु धर्माचा नाश करू शकले नाहीत आणि सहस्रावधी वर्षांनंतरही आज हिंदु धर्म ताठ मानेने उभा आहे. हिंदूंना पुरवण्यात येणारे हे आध्यात्मिक सामर्थ्य मंदिरे आणि ऋषिमुनींचे आश्रम प्रदान करत असल्याने मयान संस्कृती, रोमन संस्कृती अशा अनेक संस्कृती इतिहासजमा झाल्या. असे असले, तरी हिंदु संस्कृतीने सर्व आक्रमणे पचवली, नव्हे त्यांना नष्ट केले. गेल्या १२०० वर्षांचा इतिहास पाहिला, तर पराक्रमी हिंदु राजांच्या शौर्याच्या जोडीला मंदिरे, त्यातून देण्यात येणारे धर्मशिक्षण आणि क्षात्रधर्म यांचे धडे हे हिंदु धर्माचे रक्षण करू शकले. अन्य संस्कृती आणि हिंदु संस्कृती यांच्यातील हा भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.
आज रज-तमाने दुर्धर झालेला समाजपुरुष पहाता मंदिरांचे महत्त्व अधिक प्रभावीपणे सांगण्यासाठी अन् ते अनुभवास आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पुरो(अधो)गामित्वाच्या नावाखाली आज जिथे मंदिरांकडे धन अर्जित करण्याचे माध्यम समजून त्यांच्यावर ‘जिझिया’सारखा कर आकारला जातो, तिथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला निर्णय अभिनंदनास पात्र आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर अन्य ‘भाजपशासित राज्यांनीही अशा प्रकारचे निर्णय येणाऱ्या काळात घ्यावेत’, असे हिंदु धर्मप्रेमींना वाटते. यापुढे जाऊन केंद्र सरकारने एक अध्यादेश जारी करून देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासमवेत त्यांना करमुक्त केले पाहिजे. मंदिरांना मिळणाऱ्या ‘देव’निधीचा हिंदूंना धर्मशिक्षण देणे, धर्माचा प्रसार करणे, मंदिरांची देखभाल-दुरुस्ती करणे आदी धर्माशी संबंधित योजनांसाठी त्याचा वापर करता येईल.
अर्थात् ज्या पवित्र भूमीत येऊन मुसलमानी आक्रमकांनी हिंदु धर्मावर ग्रहण आणण्यासाठी जो आटोकाट प्रयत्न केला, त्या भूमीवर अयोध्येच्या ५०० वर्षांच्या रक्तरंजित इतिहासानंतर हिंदूंचे भव्य श्रीराममंदिर उभारले जात आहे. काशी विश्वनाथ, श्रीकृष्णजन्मभूमी मात्र न्यायाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत आहेतच ! प्रस्थापित व्यवस्थेत हिंदूंच्या मंदिरांना सुगीचे दिवस येणे दृगोच्चर नाही. त्यासाठी हिंदुहिताच्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. मंदिरांतील आपापल्या उपास्यदेवतेला शरण जाऊन हिंदूंनी संघटित होऊन त्या दिशेने कार्य करणे, ही खरी उपासना आहे, याचा या निमित्ताने उद्घोष करूया !
अध्यात्मिक सामर्थ्य देणाऱ्या मंदिरांना त्यांचे श्रेष्ठतम स्थान देण्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना करा ! |