नास्तिक शरद पवार यांनी हिंदु देवी देवतांचे बाप काढले आहेत ! – भाजपचे ट्वीट

शरद पवार

सातारा, १२ मे (वार्ता.) – नास्तिक शरद पवार यांनी हिंदु देवी देवतांचे बाप काढले आहेत. पवार नेहमीच हिंदु धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदु धर्माची अपकीर्ती केली नसती, जातीयवाद केला नसता, देवतांचा अपमान केला नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब आपल्याला शोभेल असे वक्तव्य करा, असे ट्वीट महाराष्ट्र भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये भाजपकडून शरद पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

साताऱ्याच्या सभेत शरद पवार म्हणाले होते, ‘‘जवाहर राठोड याने लिहिलेली कविता मला आठवते. त्या कवितेचे नाव पाथरवट असे होते. या पाथरवट कवितेत तो म्हणतो, ‘तुमचा दगड धोंडा आम्ही आमच्या छन्नी, हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला, पिठ करायला जे जातं लागते ते आम्ही घडवतो. ज्या जात्यातून पिठ निघते त्याने तुमचे पोट भरते; आमच्या छन्नी, हातोडा आणि घाम यांनी तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, ब्रह्मा, विष्णु आणि महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देव, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही.’’