कर्नाटकात अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केल्याने पाकचा जळफळाट !

(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा !’

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतात अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण करण्यावरून थयथयाट केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, या घटना श्रीराम सेनेच्या प्रमुखाने अजानच्या विरोधात केलेल्या विधानांमुळे चालू झाल्या आहेत. भाजपशासित कर्नाटक राज्यात अजानच्या विरोधात चालू करण्यात आलेले अभियान निंदनीय आहे. या प्रकरणी मोदी सरकार मूकदर्शक बनले आहे. या घटनांचा उद्देश मुसलमानांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार वापरू न देण्याचा आहे. यातून भारत सरकार आणि समाज यांची मुसलमानविरोधी विचारसरणी उघड होते. भारतातील घटनांसंदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा. त्यांनी भारतातील मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी भूमिका घ्यावी, अशी मागणी पाकने केली आहे.

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, भारताने अल्पसंख्य विशेषत: मुसलमानांच्या धार्मिक स्थळांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करावी. भारताने असे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत.

संपादकीय भूमिका

  • चोराच्या उलट्या बोंबा ! पाक भारतापेक्षा डावपेचात किती हुशार आहे, हेच यातून लक्षात येते ! भारताने त्याच्याकडून हे शिकले पाहिजे !
  • पाकने भारतात काय होते, याकडे पहाण्यापेक्षा पाकमध्ये गेल्या ७४ वर्षांत हिंदूंचे काय होते आहे, त्याविषयी बोलावे ! भारत सरकारनेच आंतरराष्ट्रीय संस्थांना पाकमधील हिंदूंच्या वंशसंहाराविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली पाहिजे !