वन खात्याकडून भरमसाठ शुल्क आकारणीमुळे गोव्यात पर्यटकांची नेत्रावळी अभयारण्य पर्यटनस्थळाकडे पाठ !  

सांगे (गोवा) – नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात विकसित होत असलेल्या पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी वन खात्याकडून भरमसाठ शुल्क आकारणी होऊ लागल्याने पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचे लक्षात येते. नेत्रावळी गावात पर्यटकांची गर्दी असायची. नेत्रावळी गाव पर्यटनदृष्ट्या रोजगार मिळवून देणारा ग्रामीण भाग आहे; पण वनखात्याने वाहन शुल्क आणि पर्यटकांचे प्रवेशशुल्क यांत मोठ्या प्रमाणात वाढ केल्यानेे पर्यटक नेत्रावळीऐवजी अन्य भागांना भेटी देत आहेत. यामुळे नेत्रावळीतील स्थानिकांचा रोजगारही बुडाला आहे.

नेत्रावळी अभयारण्य

वन खाते चारचाकी वाहनाला ५०० रुपये आणि प्रत्येक पर्यटकाला १०० रुपये शुल्क आकारू लागल्याने अनेक पर्यटक शुल्काचे दर ऐकून परत जात आहेत. हे शुल्क सामान्य पर्यटकांना परवडणारे नाही. दूरवरून येणारे पर्यटक हुज्जत घालत शुल्क भरतात आणि नेत्रावळीविषयी चुकीचा संदेश पसरवतात. त्यामुळे पर्यटक संख्या अल्प होत आहे.

खाण बंदीमुळे सर्वांचाच रोजगार हिरावला गेलेला असल्यामुळे धबधबे, बुडबुडे तळी, ‘स्ट्रॉबेरी’ लागवड, बागायती, मंदिरे, थंड हवेचे ठिकाण, मसाला झाडांची लागवड, अशा अनेक स्थळांमुळे नेत्रावळी गावाला रोजगार प्राप्त होऊ लागला होता; मात्र अचानक वन खात्याने पर्यटक शुल्क वाढवले. आता वन खात्याने शुल्क अल्प केले आहे; पण पुन्हा पर्यटकांची रेलचेल वाढण्यासाठी वन खात्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

शुल्क आकारणीवर शासनाचे नियंत्रण नाही का ?