मांघर (जिल्हा सातारा) हे देशातील पहिले मधाचे गाव होणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

श्री. सुभाष देसाई

मुंबई, १० मे (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील मांघर येथे ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातून मधुपालनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १६ मे या दिवशी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे ‘मांघर’ हे भारतातील पहिले मधाचे गाव होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी १० मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

सुभाष देसाई म्हणाले, ‘‘मांघर हे महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव असून गावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. या गावात मधमाशांचे सामूहिक संगोपन केले जाते. या गावात १०० कुटुंबे असून त्यांतील ८० कुटुंबे मधुपालनाचा व्यवसाय करतात. या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच चालतो. राज्यात एकूण ४९० गावांमध्ये मधुपालनाचा व्यवसाय केला जातो. यामध्ये ४० सहस्र व्यक्ती काम करतात. मधुपालनासाठी शासनाकडून आतापर्यंत २७ सहस्र मधुपेट्यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून प्रतीवर्षी १ लाख किलो मध गोळा होतो. या गावामध्ये समुहाने मधुपालन केले जाते.

शासनाकडून अन्य गावांमध्ये मधुपालनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, तसेच शुद्ध मधही मिळेल. मधमाशांची संख्या वाढल्यामुळे परागीकरण होऊन शेतीतून भरघोस उत्पन्नही मिळत असल्याचे आढळून आले आहे.’’