नागपूर – उत्तरेकडील राजस्थानमधून येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाचा पारा ४५ ते ४६ डिग्रीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या पुष्कळ वाढली आहे. गेल्या २ मासांत केवळ नागपूर येथे ११ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. गेल्या ८ वर्षांतील हा उच्चांकी आकडा आहे.
मार्च मासाच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर येथे अधिक उन्हाळ्याला प्रारंभ होतो; मात्र फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. त्यामुळे ‘या वर्षीचा उन्हाळा कठीण जाईल’, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तो खरा ठरला. गेल्या १३ दिवसांत उष्माघातामुळे ५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या २ वर्षांत उष्माघातामुळे किती लोकांचा मृत्यू झाला ?, याची नोंद आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.