नागरिकांना १० ऐवजी ७ दिवसांनी पाणी मिळणार !
संभाजीनगर – वर्ष १९८६-८७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेने शहरातील पाण्याच्या प्रश्नावर महापालिका मुख्यालयावर आक्रमक मोर्चा काढला होता. महिलांनी उपायुक्तांच्या पटलावर माठ फोडून हंडे आपटले होते. त्यानंतर अनुमाने ३५ वर्षांनी प्रथमच पाणीटंचाईसाठी शिवसेनेचे आमदार आणि ५ माजी महापौर यांचे शिष्टमंडळ महापालिका प्रशासकांच्या दालनात पोचले. १ घंट्यात झालेल्या चर्चेत शिष्टमंडळाने अनेक सूचना केल्या. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही काही सूत्रे हलवली. (अनेक दिवसांपासून पाणीटंचाई असतांना हा प्रश्न का सोडवला जात नाही ? – संपादक) याचा परिणाम म्हणजे १७ लाख संभाजीनगरकरांना २ आठवड्यानंतर १० दिवसांऐवजी ७ दिवसांनी एकदा पाणी मिळणार आहे. दुसरीकडे जलकुंभावर आंदोलन केल्यास फौजदारी गुन्हे नोंद करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे.
१. पाणीटंचाईसाठी ३० मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, तर ४ एप्रिल या दिवशी भाजपने आंदोलन केले. त्यावर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घोषित केलेल्या ९ कलमी कार्यक्रमाचा उपयोग होत नाही, असे लक्षात आल्यावर भाजपने ३ दिवसांपूर्वी एन्-७ जलकुंभावर मुक्कामी आंदोलन केले.
२. ललित सरदेशपांडे या शिवसैनिकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मग माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख हेमंत कोल्हे यांच्यावर आगपाखड केली. यातून काहीही साध्य होत नसले, तरी किमान भाजप आपली व्यथा मांडत असल्याचे लोकांना वाटत आहे.
३. हे लक्षात आल्यावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे ९ मे या दिवशी सकाळी माजी महापौर किशनचंद तनवाणी, त्र्यंबक तुपे, विकास जैन, कला ओझा, नंदकुमार घोडेले यांना घेऊन पांडेय यांच्या दालनात गेले. ‘जायकवाडी धरणात मुबलक साठा असूनही ५ दिवसांआड पाणी का मिळत नाही ?’, असा प्रश्न त्यांनी केला. ‘अधिकाऱ्यांशी समन्वय साधून दोन दिवसआड पाणी द्या’, असे ते म्हणाले.
४. अंबादास दानवे म्हणाले की, पाणी वितरणाचे नियोजन बिघडले आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. राजकारण आहे. मद्य आणि पैसे मिळाले, तर संबंधित कर्मचारी पाणी सोडतात. अधिकारी आपापल्या भागात पुरवठा होईल एवढेच बघतात. शहराचा कुणीच विचार करत नाही. (केवळ परिस्थिती सांगून न थांबता यावर उपाययोजना काढणारे लोकप्रतिनिधी हवेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाअनेक वर्षांपासून असलेली पाणी समस्या न सुटणे हे गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे नागरिकांचा संयम संपून उद्या नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ? |