स्वीस टेलिफिल्ममध्ये भारतीय शेतकऱ्यांची खाद्यसंस्कृती, कुटुंब आचार, कला आणि सार्वजनिक व्यवहार यांचे चित्रण करण्यात येणार !

कचारी सावंगा (नागपूर) येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबाची जर्मन महिलेने घेतली भेट !

नागपूर – जिल्ह्यातील कचारी सावंगा येथील प्रगतशील शेतकरी अनंत भोयर यांच्या कुटुंबाची कथा जर्मनी येथील ‘स्विस टेलिव्हिजन’ वाहिनीच्या दृश्यपटात दिसणार आहे. याच्या प्राथमिक पडताळणीसाठी जर्मन महिला डोरोथिया रिकर या भोयर यांच्या घरी आल्या आणि त्यांनी येथील सणवार, संस्कृती आणि परंपरा समजून घेतल्या. भारतीय शेतीपद्धती, तसेच शेतकऱ्यांची खाद्यसंस्कृती, कुटुंब आचार, कला, सामाजिक आणि सार्वजनिक व्यवहार यांचे चित्रण यात करण्यात येणार आहे. हा दृश्यपट इतर देशांमध्येही प्रसारित केला जाणार आहे.

भोयर यांचे घर-कुटुंब, खाद्यसंस्कृती, पाळीव प्राणी आणि जनावरे, शेतकरी संस्कृती, चित्रकला, उपन्यास, काष्ठशिल्प, बासरी-कीबोर्ड-गिटारवादन, महिलांचे भजनी मंडळ, गावातील बाजारहाट, पर्यावरणपूरक घर, अस्थीविसर्जन कुंड, सार्वजनिक सभागृह अन् मंदिर आदींविषयी बारीकसारीक माहिती घेऊन डोरोथिया रिकर परत गेल्या आहेत. तन्मय जोशी आणि श्वेता भट्टड यांचा संदर्भ घेऊन त्या येथे आल्या होत्या.

५ शेतकऱ्यांची निवड होणार !

दृश्यपटासाठी भारतातील ४-५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यापैकी २ शेतकऱ्यांकडे चाचपणी करून डोरोथिया येथे आल्या होत्या. निवड झाल्यास वाहिनीच्या २ महिला ऑक्टोबर २०२२ मध्ये दसऱ्याच्या दिवशी येथे येऊन १ आठवडा रहाणार आहेत. त्यामुळे या दृश्यपटाची उत्सुकता अनेकांना लागली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर याची चाचपणी चालू असून लवकरच याविषयी निर्णय होईल.

संपादकीय भूमिका

परदेशातील महिलेप्रमाणे भारतातील लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांना शेतकऱ्यांचे महत्त्व कधी लक्षात येणार ? परदेशातील महिला येऊन विदर्भातील शेतकरी कुटुंबाची माहिती घेते; मात्र येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची अशी माहिती घेऊन तिचा जगात प्रचार करावा, असे कधीच का सुचले नाही ? हे दुर्दैवीच आहे. जर्मन महिलेप्रमाणे येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची काळजी किंवा कळवळा असता, तर आतापर्यंत सहस्रोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या !