भारत-पाक सीमेवर २०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात ! – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

उधमपूर (जम्मू-काश्मीर) – भारत-पाक सीमेवर २०० आतंकवादी उपस्थित असून ते घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नात आहेत. सीमेवर ६ मोठ्या आणि २९ छोट्या आतंकवादी छावण्या आहेत, अशी माहिती भारतीय सैन्याचे उत्तर भागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली. ते येथे झालेल्या दोन दिवसीय ‘नॉर्थ टेक सिम्पोजियम सेमिनार’मध्ये बोलत होते. असे असले, तरी भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लेफ्टनंट जनरल द्विवेदी पुढे म्हणाले,

१. यावर्षी २१ आतंकवाद्यांना मारण्यात आले आहे.
२. गेल्या वर्षभरात पाककडून ३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
३. सीमेवर आतंकवाद्यांची हालचाल चालूच असून त्यामध्ये पाकचे सैन्य आणि त्याची गुप्तचर संघटना यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
४. कट्टरतावादावर चिंता व्यक्त करतांना ते म्हणाले की, कट्टरतावादी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
५. कलम ३७० रहित झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठे पालट दिसत आहेत. सैन्याची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ४८ सद्भावना विद्यालयांमधून १५ सहस्रांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती !

अमरनाथ यात्रेवर लेफ्टनंट जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन ‘शिवा’च्या अंतर्गत कार्यपद्धतींचे नियमन केले गेले आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा अमरनाथ यात्रेेकरूंची संख्या दुप्पट असू शकते. यात्रेच्या कालावधीत कोणतीच आतंकवादी घटना घडू नये, यासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करणार आहोत.

संपादकीय भूमिका

भारताने आणखी किती वर्षे जिहादी आतंकवाद सहन करायचा ? जिहादचा पुरस्कर्ता असलेल्या पाकच्या मुसक्या आवळणे, हाच या समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !