शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्या सर्वेक्षणाला मुसलमानांचा विरोध करण्याचा प्रयत्न !

हिंदूंकडून विरोधाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – न्यायालयाच्या आदेशानुसार ६ मे या दिवशी न्यायालय आयुक्तांकडून शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांचे चित्रीकरण आणि सर्वेक्षण करण्यात आले. शुक्रवार असल्याने ज्ञानवापी मशिदीमध्ये दुपारी मोठ्या संख्येने मुसलमान नमाजपठणासाठी आले होते. दुपारनंतर येथे सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्त, दोन्ही पक्षांचे अधिवक्ते आले असता काशी विश्‍वनाथ धामच्या प्रवेश क्रमांक ४ बाहेर मुसलमानांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या वेळी हिंदूंकडूनही या विरोधाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. या वेळी दोन्ही पक्षांकडील लोकांनी मोठी गर्दी केली होती. मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे), तर हिंदूंकडून ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांना पांगवले. येथे आधीपासूनच पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. स्वतः पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश येथे लक्ष ठेवून होते. तसेच ज्ञानवापी मशिदीचा रस्त्यावरून दिसणारा भाग पडदा लावून झाकण्यात आला होता.

न्यायालयाच्या आदेशाद्वारे सध्या या स्थळांची स्थिती काय आहे ?, याची माहिती घेतली गेली. या वेळी कोणतीही मोजणी करण्यात आली नसली, तरी न्यायालय आयुक्त अजयकुमार मिश्र यांनी स्वतः जाऊन तेथील स्थितीचे निरीक्षण केले आणि त्याचे चित्रीकरण केले. याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

‘वाराणसीमध्ये हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने रहातात’, असे म्हणणार्‍यांना चपराक ! ‘न्यायालयाच्या आदेशानुसार होणार्‍या चित्रीकरणाला अशा प्रकारे विरोध का करण्यात आला ?’, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी दिले पाहिजे ! न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात कृती करणारे कधी गुण्यागोविंदाने राहू शकतात का ?