रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) मंगला खेर

वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. पू. आजींमुळे वास्तू आणि परिसर यांमध्ये जाणवलेले पालट, त्या रुग्णाईत असतांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्यावर होत असलेली अनिष्ट शक्तींची आक्रमणे हा भाग ५ मे या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.     (भाग ५)

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

१९. रुग्णाईत असतांना पू. आजींमध्ये जाणवलेले पालट

१९ अ. ऐकू येऊ लागणे : मध्यंतरी पू. आजी रुग्णाईत असतांना त्यांना ऐकू येत नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी मोठ्याने बोलावे लागायचे. आम्ही प्रतिदिन त्यांच्यावरील आवरण काढत होतो. एक दिवस त्यांचा मुलगा (श्री. मिलिंद खेर) पू. आजींना मोठ्याने काहीतरी सांगत होता. तेव्हा त्या त्याला म्हणाल्या, ‘‘हळू बोल. मला ऐकू येते.’’ खरेच त्यांना ऐकू यायला लागले होते. त्यांचा नातू श्री. अनिकेत त्यांच्या जवळ जाऊन हळू आवाजात बोलायचा. ते त्यांना ऐकू यायचे. तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘पू. आजींना आता ऐकू येत आहे.’

१९ आ. माणसे ओळखता येऊ लागणे : मध्यंतरी त्यांना माणसे ओळखता येत नव्हती. त्यांना विचारावे लागायचे, ‘‘हे कोण आहेत ? ओळखले का ?’’ त्यांना विस्मरण झाले होते. आता त्यांना व्यक्तीचे नाव लक्षात येत नाही; पण ती व्यक्ती आठवते. त्या तिचे सर्व वर्णन करून सांगतात किंवा तिच्या गुणांचे वर्णन करतात.

१९ इ. पू. आजींचे निकामी झालेले अवयव गुरुकृपेने पुन्हा कार्यरत होणे : गुरुचरित्रात वाचले होते, ‘श्री गुरूंच्या कृपेने वाळलेले झाड पुन्हा जिवंत झाले.’ त्याप्रमाणे ‘पू. आजींचे निकामी झालेले अवयव गुरुकृपेने पुन्हा कार्यरत झाले.’ ही श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) दिव्य कृपाही आम्हाला अनुभवता आली. आता पू. आजी घरातल्या घरात फिरायला लागल्या आहेत. त्या आता अंघोळ करून देवाची पूजा करू लागल्या आहेत.

गुरुमाऊलीच्या कृपेने पू. आजींमध्ये झालेले हे सर्व पालट आम्हाला पहायला मिळाले.

‘भगवंता, आमची कुलदेवता श्री महालक्ष्मीदेवी आहे. तीच प्रत्यक्ष आमच्याकडे अवतरली असून माझ्याकडून तिची सेवा झाली’, असा भाव ठेवायला तूच मला शिकवलेस. त्यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

२०. पू. आजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘माझी मुलगी कु. पूजा एकदा कपडे वाळत घालत होती. तेव्हा पू. आजी तिला म्हणाल्या, ‘‘लहान कपडे मागे वाळत घालावेत आणि मोठे कपडे पुढे घालावेत. कपड्याची दोन्ही टोके जुळवून घ्यायला पाहिजेत. ‘त्यातही भगवंत आहे’, हे जाणले पाहिजे.’’

आ. प्रार्थना करून मगच जेवायला आरंभ करावा. सर्व कृती प्रार्थना करूनच कराव्यात आणि कृती पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी.

इ. एकदा मी दुसऱ्याविषयी चालू असलेल्या चर्चेत सहभागी झाले. तेव्हा त्या मला म्हणायच्या, ‘‘व्यक्तीच्या मागून त्याची चर्चा करू नये. त्याचे प्रारब्ध संपते आणि ते क्लेश आपल्याकडे येतात.’’ तेव्हापासून ‘कुणी इतरांच्या माघारी बोलत असेल, तर त्यात सहभागी न होता ‘हो, हो’ करून सोडून द्यायचे’, हे मला जमायला लागले.’

– सौ. वैदेही चिंचळकर (सुनेची भावजय), शिरवळ, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. (२३.३.२०२२)

२१. पू. आजींना आलेल्या अनुभूती

२१ अ. ‘पू. आजींना अंघोळ न घातलेल्या दिवशी त्यांच्याकडे प्रत्यक्ष गंगा आली’, अशी अनुभूती येणे : ‘वर्ष २०२१ मध्ये ‘आमच्या घरात आपतत्त्व वाढले आहे’, असे आम्हाला जाणवायचे. घरात लहान बेडक्या पहायला मिळायच्या. पू. आजींच्या जवळ गेल्यावर गारवा जाणवायचा. एक दिवस मला ताप आला होता; म्हणून मी पू. आजींना अंघोळ घातली नाही. दुसऱ्या दिवशी मी त्यांना अंघोळीला नेले. तेव्हा पू. आजी रडत म्हणत होत्या, ‘‘मी आता जाते.’’ तेव्हा मी शेजारील सौ. कीर्ती जोशी यांना बोलावले. त्यांनी पू. आजींना विचारले, ‘‘तू कोण ? कुठे जातेस ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘मी गंगा. मी येथे २ दिवस होते. आता मी जाते.’’ मग मी विचारले, ‘‘तुला काय देऊ ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला हळद-कुंकू दे.’’ मग मी पू. आजींना हळद-कुंकू लावले आणि त्यांच्या डोक्यावर एक फूल वाहिले. तेव्हा आजी शांत झाल्या. तेव्हा आम्हाला कळले, ‘पू. आजींकडे प्रत्यक्ष गंगा आली होती.’

कुणाला बरे नसेल, तर पू. आजी त्यांची आठवण काढतात. नंतर आम्हाला कुणाकडून तरी समजते की, त्या व्यक्तीला बरे नव्हते.

२१ आ. भैरीदेवाचा उत्सव असतांना पू. आजींना कुत्र्याच्या रूपात कालभैरवाचे दर्शन होणे : वर्ष २०२२ मध्ये रत्नागिरीत भैरीदेवाचा (कालभैरवदेवाचा) उत्सव होता; म्हणून पू. आजींचा नातू श्री. अनिकेत खेर देवळात पूजेला बसणार होता. आम्ही सर्व सिद्धता केली. माझी मोठी नणंद सौ. माधुरी प्रकाश दीक्षित यांनी दुपारच्या जेवणाची सर्व सिद्धता केली; पण आमच्या एका नातेवाइकाचे निधन झाले. त्यामुळे पूजेला दुसऱ्यांना बसवले. इकडे पू. आजी सारख्या मला सांगत होत्या, ‘‘माझ्या पायाखाली काळा कुत्रा आहे.’’ मग माझ्या लक्षात आले, ‘भैरीदेवाचे वाहन काळा कुत्रा आहे आणि तो आजींना दिसत आहे. पू. आजींना कालभैरवदेव दर्शन देऊन गेला.’

२१ इ. श्री शाकंभरीदेवीच्या दर्शनाला गेल्यावर ‘देवीने पू. आजींना मिठीत घेतले आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे : वर्ष २०२२ मध्ये श्री शाकंभरीदेवीचा उत्सव होता; म्हणून मी आणि माधुरीताई (पू. आजींची मोठी मुलगी) तिची ओटी भरायला गेलो होतो. आम्ही निघतांना पू. आजी आम्हाला म्हणाल्या, ‘‘देवीला माझा नमस्कार सांगा.’’ देवीची ओटी भरल्यावर मी आजींचा निरोप देवीला सांगितला. तेव्हा मी सूक्ष्मातून पू. आजी आणि देवी यांची भेट पाहिली. देवीने पू. आजींना मिठीत घेतले होते. तेव्हा तिथे पुष्कळ चैतन्य जाणवत होते. माधुरीताई मला म्हणाल्या, ‘‘देवीच्या मुखावर किती तेज आले आहे !’’

२१ ई. पू. आजींना होत असलेले श्री भगवतीदेवीचे दर्शन ! : आमच्या मूळ घरी रत्नागिरी येथे देवी भगवतीचे निशाण येते. देवी भगवती कोल्हापूरहून कोकणात आली. तेव्हा ती खेर-खंडकर यांच्या घरी उतरली होती. अजूनही भगवतीदेवी होळीच्या दिवशी वाजत-गाजत आमच्या घरी येते. पू. आजींना देवी घरी आलेली दिसते. तेव्हा त्या मला सारख्या ‘भगवती, भगवती’, अशा हाका मारतात. देवी त्यांना दर्शन देऊन गेल्यावर त्या मला पुन्हा ‘मीनल’, असे म्हणतात.

२१ उ. एकदा देव्हाऱ्यातील दिव्याच्या खाली ‘ॐ’ उमटला होता.

‘भगवंता, गुरुमाऊली, ‘तुम्हीच हे सुचवलेत आणि लिहून घेतलेत’, त्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

(समाप्त)

– सौ. मीनल मिलिंद खेर (सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रत्नागिरी (२३.३.२०२२)

पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांच्या कुटुंबातील ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले सदस्य

‘६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले कुटुंबात असणे, हा पू. आजींमुळेच झालेला एक मोठा चमत्कार आहे ! ’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.४.२०२२)

पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेली अनुभूती

१. प्रेमभाव

‘वर्ष २०२२ मध्ये पू. आजी रुग्णाईत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘पू. आजींना सलाईन लावणे आणि इंजेक्शन देणे’, ही सेवा मला मिळाली. पू. आजींचे वागणे लहान मुलाप्रमाणे असे. त्यातून सर्वांना आनंद मिळत असे. त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव जाणवतो. त्यांच्या मनात सर्वांप्रती समभाव असतो. मी घरी जातांना ‘निघते’, असे सांगितल्यावर ‘उद्या नक्की ये’, असे त्या मला म्हणायच्या.

२. साधिकेने पू. आजींना साहाय्य केल्यावर त्यांनी तिच्या हातावरून प्रेमाने हात फिरवत कृतज्ञता व्यक्त करणे

एकदा पू. आजींच्या जवळ घरातील कोणीच नव्हते. तेव्हा देवानेच मला त्यांच्याकडे जाण्याची बुद्धी दिली. आजींना लघुशंकेला जायचे होते. त्या साहाय्यासाठी कोणाची तरी वाट पहात होत्या. मी तेथे गेल्यावर त्यांनी मला ते सांगितले. तेव्हा मी लगेच त्यांना लघवी करण्यासाठी भांडे दिले. तेव्हा त्यांना फार बरे वाटले. त्यांनी माझ्या हातावरून प्रेमाने हात फिरवत कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत आला. ‘देव संतांची काळजी कशी घेतो !’, हेही मला अनुभवता आले.

‘भगवंतानेच ही गुरुसेवा करवून घेतली’, त्याबद्दल त्याच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. समृद्धी सचिन सनगरे, रत्नागिरी (२३.३.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.