मुंबईतील २६ मशिदींत पहाटेची अजान भोंग्याविना होणार !

मुंबई – दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना देण्याचा निर्णय घेतला. ४ मे या दिवशी सुन्नी बडी मशिदीत मौलवी आणि मुसलमान धर्मगुरु यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या भोंग्यांविषयीच्या आदेशाचे पालन करण्याचा ठराव करण्यात आला.

या बैठकीला भायखळा येथील मदनपुरा, तसेच नागपाडा आणि आग्रापाडा येथील मुसलमान धर्मगुरु उपस्थित होते. या बैठकीनंतर मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीमध्येही ४ आणि ५ मे या दिवशी पहाटेच्या अजानसाठी भोंग्यांचा वापर करण्यात आला नाही.

ज्या मशिदींवर भोंगा लावण्यात येईल, त्या मशिदीच्या जवळील मंदिरांवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मौलवी आणि मुसलमान धर्मगुरु यांनी ही बैठक घेतली.