मध्यंतरी मी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो होतो. तेथे माझी एका क्षेत्रोपाध्यायांची भेट झाली. त्यांच्याकडे गेल्या २०० वर्षांची वेदपाठशाळा चालवण्याची परंपरा आहे आणि आजही ती परंपरा अव्याहतपणे चालू आहे. त्यांच्याशी चर्चा करतांना ब्राह्मणद्वेषाचे सूत्र निघाले. मी म्हणालो, ‘‘हा ब्राह्मणद्वेष आता हिंसक होत असल्याने आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचा काळ फारच खडतर आहे.’’ यावर ते म्हणाले, ‘‘ब्राह्मणांना कायमच अस्तित्वाचा प्रश्न राहिला आहे आणि ते चांगलेही आहे. काळ पालटत नाही, तो तसाच आहे. ब्राह्मण मुळात अत्यंत अधःपतनशील आणि आळशी आहेत. यांना कुठेही स्थैर्य आणि समृद्धी मिळाली की, ते कर्तव्य विसरतात आणि धर्मग्लानी येते. त्यामुळे ते कायम तलवारीच्या टोकावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःही धर्माचरण करतात आणि समाजालाही धर्माचरण करायला लावतात.’’
पुढे ते म्हणाले, ‘‘आजचा ब्राह्मण काय करतो ? तो सामाजिक दायित्व नाकारतो. तो ‘मी बरा, माझी नोकरी बरी आणि माझे कुटुंब बरे’, असा विचार करतो. ब्राह्मण आत्मकेंद्रित झाल्याने संपूर्ण समाजाचे नैतिक अधःपतन होत आहे आणि त्याचे पातक ब्राह्मणांवरच फोडले जाणार आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी कार्यक्षम होणे अत्यंत आवश्यक आहे. समाज तुम्हाला शिवीगाळ करत असेल, तुमचा द्वेष करत असेल, तर आत्मपरीक्षण करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. तरीही कुणी तुमचा द्वेष करत असेल, तर त्याला प्रेमाने आणि तर्काने समजावून त्याचे मतःपरिवर्तन करा आणि तरीही तो सुधारला नाही, तर वैध मार्गाने पुढे चला. धर्म तुम्हाला याची अनुमती देतो.
म्हणून ब्राह्मणद्वेष आणि शिवीगाळ यांमुळे व्यथित झालेल्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी घाबरून जाऊन उगीच चिंता करू नये. अर्जुन विषादाचा त्याग करून ब्राह्मणद्वेष्ट्यांच्या सूत्रांचे खंडण करणे, हे आपले कर्तव्य आहे. समाजाला दिशा देणे, हे आपले कर्तव्य आहे आणि या कर्तव्याकडे आपण पाठ फिरवली; म्हणूनच आपल्याला समाज शिव्या घालतो आहे, हे समजून घ्या.’’
जय परशुराम !
– एक धर्मप्रेमी
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)