(म्हणे) ‘टिळकांनी शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी हडप केला !’

श्रीमंत कोकाटे यांच्याकडून लोकमान्य टिळकांचा अवमान

श्रीमंत कोकाटे

पुणे, ३ मे (वार्ता.) – छत्रपती शिवरायांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. टिळकांनी शिवसमाधीचा एक साधा दगडही बसवला नाही, याउलट शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी हडप केला, असे पुरावेहीन आरोप श्रीमंत कोकाटे यांनी केले. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक बेताल वक्तव्ये करत बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी पुन्हा एकदा गरळओक केली.

‘राज ठाकरे हे शिवद्रोही आहेत’, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना विरोध केला. ‘निधी हडप केल्याविषयी काही पुरावे आहेत का ?’, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर श्रीमंत कोकाटे यांनी ‘पुरावे आहेत’ असे एका वाक्यात उत्तर देत प्रश्नाला बगल दिली. पुन्हा पत्रकाराने संदर्भ विचारल्यावर ‘रक्कम ठेवलेले अधिकोष जरी बुडाले, तरी अधिकोषात ठेवलेली काही रक्कम विविध शिवाजी महाराजांविषयीच्या कार्यक्रमांसाठी अनावश्यक (?) खर्च केली. यासाठी टिळक जबाबदार आहेत’, असे राहुल पोकळे यांनी सांगितले. (एकीकडे रक्कम शिवरायांच्या कार्यक्रमांसाठी खर्च केली असे म्हणतांना दुसरीकडे अनावश्यक खर्च होता, असे राहुल पोकळे यांनी सांगितले. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलेल्या, देशाच्या स्वातंत्र्याची दूरदृष्टी असलेल्या क्रांतीकारकांविषयी अशा टिप्पणी करणे, ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट करते ! – संपादक)