राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

संभाजीनगर येथील सभेत अटींचे उल्लंघन केल्याने कारवाई

संभाजीनगर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे या दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेतील १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यासह आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यांपैकी १२ अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. ‘पोलिसांच्या अटी किंवा नियम यांचे पालन झाले नाही, तर पोलीस कारवाई करतील’, अशी चेतावणी पोलिसांनी ठाकरे यांना सभेपूर्वी पाठवलेल्या नोटिसीत दिली होती.

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न ! – संदीप देशपांडे, मनसे नेते

संदीप देशपांडे, मनसे नेते

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, ‘‘सभेला अनुमती न देणे, तसेच जाचक अटी घालणे, असे पोलिसांनी केले आहे. यापूर्वी कुठल्या सभेला अशा अटी घातल्या होत्या का ? आम्हाला वाटते की, राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव आहे. आम्हाला निश्‍चिती आहे की, पोलिसांनी लावलेली कलमे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. आम्हाला घाबरवण्यासाठी हे गुन्हे नोंद केले गेले आहेत; पण महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, आंदोलन होणारच.’’

सभेत राज ठाकरे यांचा आवाज अडीचपटींनी वाढला !

राज ठाकरे यांच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हेच प्रमुख सूत्र होते; मात्र त्यांनी स्वत:ही नियमांचे पालन केले नाही. पोलिसांनी ५० डेसिबल्सची (आवाज मोजण्याचे प्रमाण) मर्यादा घालून दिली होती. त्याच्या अनुमाने अडीचपट, म्हणजे १२० डेसिबल्सपर्यंत त्यांचा आवाज पोचला होता. या प्रकरणी मुंबई येथे अहवाल पाठवला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

यासह ‘सभेत जात, धर्म, पंथ आणि वंश यांविषयी प्रक्षोभक वक्तव्य करू नये’, अशीही अट घालण्यात आली होती. त्याचा भंग झाला कि नाही ?, हे पडताळून मुंबई येथे अहवाल पाठवला जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली.