उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चेतावणी
नाशिक – समयमर्यादा (अल्टिमेटम्) वगैरे काही नाही. हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाची हुकूमशाही चालणार नाही. ‘मी म्हणेन तेच होणार’, हे शक्य नाही. विविध समाजाचे लोक येथे रहातात. कायदा सर्वांना सारखाच आहे. तो मोडल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. राज ठाकरे यांच्या सभेविषयी पोलीस त्यांचे काम करतील, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जर सभेत कायद्याचे पालन केले असेल, तर ठीक आहे; मात्र जर कायद्याचे उल्लंघन केले असेल, तर कारवाई होईल. निवडणुकीपूर्वी राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलत होते. आता त्यांचे मत परिवर्तन झाले आहे. उद्या खटले कार्यकर्त्यांवर प्रविष्ट होणार आहेत. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती आहे. त्याप्रमाणेच सर्व चालू आहे; मात्र ते शिवतीर्थावर बसून बोलतील. लोकांना भाषण करून भडकावून देणे सोपे असते; मात्र त्यामुळे जातीयवाद निर्माण होणार असेल, समाजात तेढ निर्माण होणार असेल, तर ते महाराष्ट्राला परवडणारे नाही.
संपादकीय भूमिकाकायद्यानुसार वर्षानुवर्षे अवैध भोंगे काढले गेले नसल्याने, हे कायद्याचे राज्य आहे का ? असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? त्यामुळे ‘कायदा सर्वांना सारखा’च आहे, असेही हिंदूंना वाटत नाही, त्याला काय करावे ? |