मुंबई – देशातील पहिलाच महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प राबवण्यास २८ एप्रिल या दिवशी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र जनुक कोष (जनुकीय माहिती उपलब्ध असलेला कोश) प्रकल्पातील शिफारशीनुसार राज्यात कार्यवाही केल्यास राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणार्या पिढीसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पांतर्गत जनुकीय संपत्तीचे जतन करण्याच्या अनुषंगाने सागरी जैवविविधता, पिकांचे स्थानिक वाण, पशूधनाच्या स्थानिक जाती, गोड्या पाण्यातील जैवविविधता, गवताळ, माळरान आणि कुरणांमधील जैवविविधता, वनहक्क क्षेत्रासाठी संरक्षण अन् व्यवस्थापन योजना, वन परिसर पुनर्निर्माण हे ७ महत्त्वाचे घटक निश्चित करण्यात आले आहेत. वरील ७ घटकांना पूरक असे माहितीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने वर्ष २०१४-२०१९ पर्यंत राबवलेल्या प्रकल्पातून आतापर्यंत काही यंत्रणा सिद्ध झाली आहे. संसाधने कायमस्वरूपी चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणि जनुक कोशाची व्याप्ती वाढवण्यासाठी हा प्रकल्प राज्यभर राबवण्यात येणार आहे.