कोल्हापूर, ३० एप्रिल (वार्ता.) – पुणे ते कोल्हापूर या महामार्गावर वेगाने गाडी चालवल्यामुळे मला यापूर्वी साडे बारा सहस्र रुपयांचा दंड झाला आहे. तो मी भरला आहे. आता पुन्हा साडे बारा सहस्र दंड झाला असून तोही भरला आहे. एकीकडे रस्ते चांगले करायचे गाड्या महागड्या घ्यायच्या आणि वेगाने गाडी चालवायची नाही. वेगाने गाडी चालवल्यावर दंड आकारायचा हे कुठेतरी चुकीचे आहे. गाडी नियंत्रणात असायला पाहिजे याविषयी दुमत नाही; पण ही वेगमर्यादा सध्याची स्थिती पाहून वाढवण्याची आवश्यकता आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
या संदर्भात श्री. पाटील पुढे म्हणाले, ‘‘गाडीला वेगमर्यादा असलीच पाहिजे याविषयी माझा विरोध नाही; मात्र वेगमर्यादा किती असावी ? यावर विचार व्हायला हवा. आता ज्या पद्धतीने दंड वसूल केला जात आहे, त्याला माझा विरोध आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक असून आता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे.’’
याप्रकारे ‘पुणे-सातारा’, या मार्गावरही अनेकांना ‘सीसीटीव्ही’ने टिपल्याने मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी उतार असून तेथे वेग आपोआप वाढतो; मात्र वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास दंडाचा फटका बसतो. वेळ वाचवण्यासाठी शासनाने रस्ते चांगले करून दिले आहेत आणि दुसरीकडे मात्र त्याच रस्त्यांवर ८० किमी प्रतिघंटा वेगाची मर्यादा घातली जात आहे, हे अयोग्य वाटते, असे प्रवास करणारे अनेक आधुनिक वैद्य, तसेच उद्योगपती यांनी सांगितले. अशा प्रकारे ‘सीसीटीव्ही’ लावून दंड वसूल करणे ही ‘शासनमान्य लूट’च आहे, असे मतही अनेकांनी व्यक्त केले. या संदर्भात प्रशासनाने आता धोरण ठरवण्याची वेळ आली असून वेगमर्यादा वाढवून प्रवाशांना सुरक्षित पण वेगवान जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे, तसेच अकारण बसणार्या दंडातून दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत. |