कोल्हापूर, १ मे (वार्ता .) – मूल्यवर्धित कर विभागातील (जी.एस्.टी.) अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. या कारवाईविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती आणि संशयितांना न्यायालयात उपस्थित केल्यावरच ही कारवाई समोर आली. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदाराने वर्ष २०१७-१८ ते २०२० मधील सेवाकर दायित्वाविषयी प्रकरण निकाली काढण्यासाठी आवेदन दाखल केले होते. हे प्रकरण निकालात काढण्यासाठी वरील अधिकार्यांकडून तक्रारदाराकडे ७५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. अखेर ५० सहस्र रुपयांवर तडजोड झाली. या संदर्भात तक्रादाराने थेट केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे तक्रार दिली. तक्रारीची सत्यता पडताळून पाहून केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने या अधिकार्यांना जयसिंगपूर येथे सापळा लावून अटक केली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारग्रस्त भारत ! प्रत्येक वेळी अशा प्रकारे लाच घेतांना अधिकारी सापडतात आणि त्यातील फार थोड्यांनाच प्रत्यक्षात शिक्षा होते. असे प्रकार थांबवण्यासाठी ‘परत कुणाची लाच घेण्याचे धाडस होणार नाही’, अशा प्रकारच्या मोठ्या शिक्षेची आवश्यकता अधोरेखित होते ! |