महाराष्ट्रात घातपाताचा कट ?

धुळे पोलिसांनी ९० तलवारी हस्तगत करत चार जणांना अटक केली

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी एका वाहनात पोलिसांना एकूण ९० तलवारी सापडल्या. ही शस्त्रास्त्रे राजस्थान येथून जालन्याकडे नेण्यात येणार होती. तेव्हा गस्त घालणार्‍या पोलिसांनी केलेल्या झडतीत त्यांना या तलवारी सापडल्या. नांदेड येथे १ दिवसापूर्वी एका रिक्शामध्ये २५ तलवारी सापडल्या. या तलवारी पंजाब येथून पाठवण्यात आल्या होत्या, तर ३ आठवड्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात कुरिअरने मागवलेल्या ९७ तलवारी पोलिसांनी पकडल्या. संभाजीनगर येथेही २ – ३ वेळा कुरिअरने मागवलेल्या तलवारी पकडण्यात आल्या होत्या. त्या तलवारी तेव्हा चक्क ‘फ्लिपकार्ट’, ‘ॲमेझॉन’ या ‘ऑनलाईन शॉपिंग’ सुविधा असणार्‍या संकेतस्थळांवरून मागवण्यात आल्या होत्या. ‘महाराष्ट्रात वारंवार मोठ्या संख्येत तलवारी सापडण्याचे उघड होणारे प्रकार हे एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे कि काय ?’, असे वाटते. यापूर्वी शस्त्रास्त्रे सापडण्याचे प्रकार घडल्याचे आठवत नाही.

२ वर्षांपूर्वीच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, ‘महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बाहेरील देशांमधून, राज्यांतून मौलवी येत आहेत. ‘ते कुठे जातात ?’ ‘काय करतात ?’ ‘कशासाठी जमतात ?’, याविषयी पोलिसांनी माहिती घ्यावी. पोलिसांना कारवाई करण्यासाठी शासनकर्त्यांनी मोकळीक द्यावी. जेणेकरून ते हा सर्व प्रकार रोखू शकतील’, अशी विधाने केली होती. तेव्हा त्यांनी या विधानांना गांभीर्याने घेण्याचे आवाहन शासनकर्त्यांना केले होते; मात्र त्याविषयी शासनकर्त्यांनी १-२ वेळा भाष्य करून कृती काहीच केली नाही. आताच ३-४ मासांपूर्वी महाराष्ट्रात अमरावती आणि अन्य आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या संख्येत धर्मांधांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. आझाद मैदान येथील दंगलीचे आरोप असलेल्या रझा अकादमीचा यात सहभाग असल्याचे लक्षात आले होते. तिच्यावरही काही कारवाई झाली नाही. गत काही मासांपासून तलवारी सापडण्याच्या घटना उघड झाल्यावर त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलीस, गुप्तचर विभाग यांनी केला होता का ? त्याविषयी माहिती पोलिसांनी गोळा केली असेल, तर त्याविषयी काय कृती केली ? हे लोकांना कळणे आवश्यक आहे. त्यानंतरही शस्त्रास्त्रे सापडण्याच्या घटना घडतच आहेत. त्यातही उघड झालेल्या घटना मोजक्याच आहेत, मग न उघड झालेल्या किती असतील ? आणि अशी कितीतरी शस्त्रे कुठे कुठे गेली असतील ? याचाही पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणायला हवे. एवढ्या संख्येत तलवारी सापडल्यावर सर्वसामान्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच देहलीच्या जहांगीरपुरा भागात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरील आक्रमणाच्या वेळी धर्मांधांकडून मोठ्या संख्येत तलवारी दाखवण्यात आल्या. त्याचे व्हिडिओही प्रसारित झाले. मिरवणुकीत नि:शस्त्र असलेले हिंदू आणि पोलीस यांना मार खावा लागला. तेव्हा घटनांची भीषणता लक्षात घेऊन सरकारने याविषयी कृती करावी, अशी अपेक्षा आहे; कारण अशा अवैध शस्त्रास्त्रांचा उपयोग बहुतांश वेळा हिंदूंच्या विरोधात होतो, असाच इतिहास आहे. त्यामुळे या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पहाणे अपेक्षित आहे !