केरळचे माजी आमदार पी.सी. जॉर्ज यांची जामिनावर सुटका

मुसलमानांच्या व्यवसायावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याचे प्रकरण

काँग्रेसचे माजी नेते आणि माजी आमदार पी.सी. जॉर्ज

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील मुसलमानांच्या उपाहारगृहांमध्ये मिळणार्‍या चहासारख्या पेयांमध्ये अमली पदार्थ असतात. याद्वारे हिंदूंना नपुंसक आणि महिलांना वांझ बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याद्वारे मुसलमानांना देशावर नियंत्रण मिळवायचे आहे. त्यामुळे मुसलमानांच्या व्यवसायावर बहिष्कार घाला, असे आवाहन केरळमधील काँग्रेसचे माजी नेते आणि माजी आमदार पी.सी. जॉर्ज यांनी हिंदूंच्या एका कार्यक्रमात केले होते. यावर ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे नेते पी.के. फिरोज यांनी केलेल्या तक्रारीनंतर जार्ज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला आहे.

हिंदु राष्ट्र कह्यात घेण्याच्या ध्येयाकडे मुसलमानांची वाटचाल ! – पी.सी. जॉर्ज

जॉर्ज पुढे म्हणाले होते, ‘मुसलमान इतर समाजाकडून पैसे मिळवण्यासाठी मुसलमानेतर भागांत व्यवसाय चालू करत आहेत. अशा व्यापारावर बहिष्कार घातला पाहिजे. हिंदू आणि ख्रिस्ती महिला अधिक मुले जन्माला घालण्यास इच्छुक नसतात; मात्र मुसलमान महिला हे काम अतिशय गांभीर्याने करतात. हिंदु राष्ट्र कह्यात घेण्याच्या ध्येयाकडे त्यांची वाटचाल चालू आहे. हिंदू आणि ख्रिस्ती महिलांनी किमान ४ मुले जन्माला घालणे आवश्यक आहे.’