संभाजीनगर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी होणाऱ्या बहुचर्चित सभेला २८ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पोलिसांनी १५ अटींसह अनुमती दिली आहे. त्यासाठी आयुक्तालयात सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमान ३ बैठका झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला चारही दिशांनी ३०० पोलीस असतील. मैदानाभोवती किमान २ सहस्र पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा वेढा रहाणार आहे. मैदानात ४ सीसीटीव्ही लागले असून ही संख्या १० ते १५ होईल.
विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर यांना बोलावून पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी १५ अटी सांगत अनुमती दिली आहे. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार शहरात एकूण ३ सहस्र ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यापैकी किमान १ सहस्र ५०० पोलीस सभेच्या बंदोबस्तासाठी तैनात असतील. उर्वरित पोलीस मंत्री आणि काही कार्यक्रमांसाठी नियुक्त असतील. त्याशिवाय ५ जिल्ह्यांमधून ३०० पोलीस कर्मचारी येतील. राज्य राखीव दलाच्या ६ तुकड्याही मागवण्यात आल्या आहेत.
मनसैनिकांकडून महाआरती आणि फेरी काढून शहरात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न !
शहरातील २० मंदिरांत महाआरती करत फेरी काढून मनसैनिकांनी वातावरणनिर्मिती केली. २ दिवस हाच ‘पॅटर्न’ राहील. शहरात होर्डिंग्ज आणि झेंडे लावण्यात आले आहेत. २५ सहस्र पत्रिका वाटण्यात आल्या आहेत. कर्णपुरा येथील मैदानात वाहनतळाची व्यवस्था असेल. तेथून सभास्थळी जाण्यासाठी विनामूल्य रिक्शा असतील. ८० सहस्र क्षमतेच्या मैदानात ५० सहस्र आसंद्यांची व्यवस्था आहे. मैदानाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर ८ ते १० सहस्र लोक बसू शकतील.
… तर ५० डेसिबलहून आवाज वाढवू ! – बाळा नांदगावकर, नेते, मनसे
मनसेचे नेते बाळा नांदगावकर पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘सभेला कम्युनिस्ट, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही येतील. पोलिसांना गर्दीचे नियोजन करायचे असल्याने अनुमतीस वेळ लागला असावा. ५० डेसिबल आवाजाची अट आहे; मात्र ऐकू येत नाही, असे लोक म्हणाले, तर आवाज वाढवावा लागेल.’’
हिंदुत्वाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची सभा होणार आहे ! – कमलेश कटारिया, भाजप
संभाजीनगर – या सभेविषयी भाजपचे सिल्लोडचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया म्हणाले की, ही केवळ राजकीय सभा आहे, असे तिच्याकडे बघू नका. हिंदुत्वाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची सभा होणार आहे. या सभेला अधिकाधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांच्या सभेचा भाजपकडून घरोघरी प्रचार चालू ! – चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
राज ठाकरे यांच्या येथील सभेचा भाजपकडून घरोघरी प्रचार चालू आहे, असा आरोप शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे यांची सभा झाल्यास भोंग्यांवरून दंगल होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांनी या सभेला अनुमती देण्याविषयी विचार करावा.