चीनमध्ये पहिल्या मानवी संसर्गाची नोंद !
बीजिंग (चीन) – चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच्३एन्८’ प्रकाराच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. जगात बर्ड फ्लूचा माणसामध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे; पण त्याचवेळी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका अल्प असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही, असे यात सांगण्यात आले आहे. एच्३एन्८चा फ्लू घोडे, कुत्रे आणि पक्षी यांमध्ये प्रथम आढळला. तथापि याचे कोणतेही मानवी प्रकरण अद्याप नोंदवले गेले नव्हते.
#China has confirmed the first known human case of the H3N8 strain of avian flu, but health authorities say there is a low risk of widespread transmission among people.https://t.co/fdhuYcxWb5
— Hindustan Times (@htTweets) April 27, 2022
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, ४ वर्षांच्या एका मुलाला याचा त्रास झाला होता. तापासह अनेक लक्षणे विकसित झाल्यानंतर मुलाला एच्३एन्८ विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्याच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती मात्र या विषाणूच्या विळख्यात आली नाही. मुलगा त्याच्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळे यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले.