सीबीएस्ईने अभ्यासक्रमातून इस्लामी साम्राज्य, शीतयुद्ध आदींवरील धडे वगळले !

हे पालट स्वागतार्ह जरी असले, तरी सीबीएस्ईने त्यापुढे जाऊन इस्लामी आक्रमकांचा क्रूर इतिहास नव्या पिढीला सांगणे आवश्यक आहे. त्याचसमवेत हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे धडे देऊन वास्तविक इतिहास समोर ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे ! केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यासाठी प्रयत्न करावेत, असेच इतिहास अन् राष्ट्र प्रेमींना वाटते !

नवी देहली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (‘सीबीएस्ई’ने) इयत्ता ११ वी आणि १२ वी यांच्या ‘इतिहास’ आणि ‘राजनीति विज्ञान’ या पुस्तकांतून अलिप्तता आंदोलन, शीतयुद्ध, आफ्रिकी आणि आशिया क्षेत्रांमध्ये इस्लामी साम्राज्याचा उदय, मोगलांचा इतिहास, औद्योगिक क्रांती यांसंदर्भातील धडे वगळले आहेत. याच प्रकारे इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमातून ‘खाद्य सुरक्षे’च्या संदर्भातील धड्यातील ‘कृषीवर जागतिकीकरणाचा प्रभाव’ हा विषय वगळला आहे. ‘धर्म, धर्मांधता, राजकीय धर्मांधता, धर्मनिरपेक्ष राज्य’ या खंडातून फैज अहमद फैज यांच्या २ उर्दू कवितांचा भाषांतरित भाग वगळण्यात आला आहे. सीबीएस्ईच्या एकूणच अभ्यासक्रमातून ‘लोकशाही आणि विविधता’ हा भागही वगळण्यात आला आहे.

याविषयी संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, परिवर्तन हा अभ्यासक्रमाला अधिक चांगले बनवण्याचा भाग आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन. सी. ई. आर्. टी.) यांच्या शिफारशींनुसार हा पालट आहे.