नारळ पाणी, संत्र्याचा रस, भारतीय गायीचे दूध व्यक्तीमध्ये सकारात्मकता वाढवते, तर ‘वाईन’, ‘व्हिस्की’, ‘बियर’ नकारात्मकता वाढवते !

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने लंडन येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत पेयांवरील संशोधन सादर !

  • शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक !

मुंबई – खाद्यपदार्थ आणि पेये त्यांच्या गुणधर्मांनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात. त्यानुसार त्यांचे सेवन केल्याचा आपल्या आध्यात्मिक स्थितीवर आणि प्रभावळीवर परिणाम होतो. नारळाचे पाणी, संत्र्याचा रस किंवा भारतीय गायीचे दूध यांसारख्या सात्त्विक पेयांचे सेवन केल्याने व्यक्तीला या पेयांच्या माध्यमांतून सकारात्मकता मिळते आणि तिचा व्यक्तीला अन् त्याच्या भोवतालच्या समाजालाही शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. दुसरीकडे ‘वाईन’, ‘व्हिस्की’, ‘बियर’, तसेच ‘ब्रँडेड’ (प्रथितयश आस्थापनांची उत्पादने) बाटलीबंद पाणी व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा नष्ट करून नकारात्मक ऊर्जा वाढवते, असे संशोधनामध्ये दिसून आल्याचे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. लंडन (ब्रिटन) येथील ‘कॉन्फरन्स सीरिज एल्.एल्.सी. लिमिटेड कॉन्फरन्सेस’ (Conference Series LLC LTD Conferences) यांनी आयोजित केलेल्या ‘फूड अँड बेवरेजेस’च्या ३१ व्या जागतिक परिषदेत ते बोलत होते.या वेळी श्री. क्लार्क यांनी ‘मद्यपानाचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर श्री. शॉन क्लार्क सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने वैज्ञानिक परिषदांमध्ये करण्यात आलेले हे ८८ वे सादरीकरण होते.

श्री. क्लार्क यांनी म्हटले की,

१. विश्वविद्यालयाने केलेल्या एका प्रयोगात ८ पेये आणि त्यांचा व्यक्तींच्या प्रभावळीवर होणारा सूक्ष्म परीणाम ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या ऊर्जा मापक उपकरणाद्वारे अभ्यासण्यातआले. यातून असे लक्षात आले की, प्रयोगात वापरलेल्या सर्वच मद्यांमध्ये ११.५ टक्के ‘अल्कोहोल’ असूनही ‘रेड वाईन’ची प्रभावळ सर्वाधिक नकारात्मक होती. त्यानंतर अनुक्रमे ‘व्हिस्की’ आणि ‘बियर’ यांची होती. प्रथितयश आस्थापनांच्या बाटलीबंद पाण्यातही नकारात्मक स्पंदने होती.

२. नारळाचे पाणी, संत्र्याचा ताजा रस, भारतीय गायीचे दूध आणि गोव्यातील आध्यात्मिक संशोधन केंद्रातील पाणी यांमध्ये नकारात्मक प्रभावळ मुळीच नव्हती, तर केवळ सकारात्मक प्रभावळ होती.

३. अन्य एका प्रयोगात एक पुरुष आणि एक महिला यांना प्रतिदिन वेगवेगळे पेय असे ८ वेगवेगळ्या दिवशी ८ वेगवेगळी पेये सेवन करण्यास सांगण्यात आले. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाने त्या दोघांनी प्रतिदिन पेय सेवन करण्यापूर्वी आणि पेय सेवन केल्यानंतर ५ मिनिटे अन् ३० मिनिटे झाल्यानंतर केलेल्या निरीक्षणांतून लक्षात आले की, दोघांच्या सकारात्मक प्रभावळींवर भारतीय गायीच्या दुधाचा सर्वांत चांगला परिणाम झाला. सकारात्मकता ५०० ते ६०० टक्के वाढून दोघांची नकारात्मक प्रभावळ ९१ टक्क्यांपर्यंत घटली. संत्र्याच्या रसानेही सकारात्मक प्रभावळ ३५८ टक्क्यांनी वाढली आणि नकारात्मक प्रभावळ ८५ टक्क्यांनी घटली.

४. ‘व्हिस्की’, ‘बियर’ आणि ‘वाईन’ या नकारात्मक परिणाम करणाऱ्या पेयांनी ५ मिनिटांतच दोन्ही व्यक्तींमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णतः नष्ट केली. ‘बियर’मध्ये सर्वाधिक नकारात्मकता आढळली. तिचे सेवन केल्यानंतर एका व्यक्तीमधील नकारात्मकता जवळ जवळ ५ सहस्र टक्क्यांपर्यंत वाढली. त्या खालोखाल नकारात्मक परिणाम हा ‘रेड वाईन’चा आढळला. प्रयोगात तिचे सेवन करणाऱ्या महिलेची नकारात्मक प्रभावळ अर्ध्या घंट्यातच ३ सहस्र ६९१ टक्के आणि पुरुषाची १ सहस्र ३९६ टक्के वाढली. ‘कोला’ पेयाचाही दोघांवर नकारात्मक परिणाम झाला.

५. ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ हे उपकरण वापरून केलेल्या अभ्यासात ‘वाईन’ सेवन केल्यानंतर व्यक्तीचे कुंडलिनीचक्र मध्य रेषेपासून पुष्कळ दूर झाले आणि त्याची ऊर्जा न्यून झाली, असे आढळले. हे प्रतिकूल परिणामाचे दर्शक आहे.

६. त्याचप्रमाणे पार्टीमध्ये (मेजवानीमध्ये) सेवन करण्यात आलेल्या पेयांचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी संगीत, पाश्चात्त्य नृत्य आणि शाकाहारी खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेली एक पार्टी आयोजित करण्यात आली. सहभागी झालेल्या १० जणांपैकी काहींना एकसारखेच ‘अल्कोहोल’चे प्रमाण असलेली पेये आणि काहींना ‘अल्कोहोल’ नसलेली पेये देण्यात आली. ती २ घंट्यांमध्ये सेवन करायची होती.

यानंतर केलेल्या प्रभावळींच्या निरीक्षणांमध्ये आढळले की, पार्टीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या प्रभावळीतील सकारात्मकता पूर्णपणे नाहीशी झाली होती. ‘अल्कोहोल’ नसलेल्या पेयांमधील सकारात्मकता तेथील संगीत आणि वातावरण यांमुळे नष्ट झाली होती अन् त्यामुळे ती सेवन केलेल्या व्यक्तींमध्ये नकारात्मक प्रभावळ निर्माण झाली.