दुसरा मजला जळून खाक
नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात २०० वर्षे जुन्या सद्गुरु तोताराम महाराज मंदिराला २१ एप्रिल या दिवशी सकाळी भीषण आग लागली. आगीत मंदिरावरील दुसरा मजला जळून खाक झाला. अग्नीशमन दल आणि गावकरी यांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली; मात्र आगीचे कारण समजलेले नाही.
जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या काठावर प्रकाशा हे गाव वसलेले आहे. हे एक तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र दक्षिण काशी म्हणूनही प्रख्यात आहे. तापी आणि गोमाई या नद्यांच्या संगमामुळे याचे पावित्र्य वाढले आहे. केदारेश्वर आणि संगमेश्वर, असे शिवाचे मंदिर येथे असून १२ मास येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. पावसाळ्यात येथील नद्या दोन्ही थळी तुडुंब भरून वहातात. तरीही महादेवाची पिंड आणि मंदिर यांना आजतागायत कुठलीही हानी पोचलेली नाही. महाशिवरात्री आणि श्रावणाच्या काळात येथे पुष्कळ गर्दी होते.